Join us

बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 8:52 AM

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Baba Siddique Murder Case : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दिग्गज नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईत तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. अचानक झालेल्या या हल्ल्यात त्यांच्या पोटात आणि छातीत गोळी लागली होती. याप्रकरणी पोलिसांनी करनैल सिंग आणि धर्मराज कश्यप नावाच्या दोघांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान दोघेही लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य असल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी धर्मराज कश्यप याने अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यानंतर कोर्टाने त्याचे वय तपासून घेण्याचे आदेश दिले होते. आता पोलिसांच्या चौकशीत धर्मराज कश्यपबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी धर्मराज कश्यपची मुंबई पोलिसांनी ऑसिफिकेशन चाचणी म्हणजेच वय निश्चिती चाचणी केली आहे. हाडांच्या चाचणीतून तो अल्पवयीन नसल्याचे समोर आलं आहे. मुंबईतील न्यायालयाच्या आदेशानंतर ही चाचणी घेण्यात आली. त्यानंतर आरोपी धर्मराज कश्यप आणि इतर आरोपीला २१ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथील गंडारा गावचा रहिवासी आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मराज विरुद्ध सध्या कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड सापडलेला नाही. तो एका सामान्य कुटुंबातील असून मजूर म्हणून मुंबईत आला होता.

दुसरीकडे, याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे येथून २८ वर्षीय प्रवीण लोणकर याला अटक केली आहे. निर्मल नगर गोळीबार प्रकरणातील शुभम लोणकरचा तो भाऊ आहे. या भावांनी सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचला होता आणि या कटात कश्यप आणि शिवकुमार गौतम यांचा समावेश होता, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणातील शिवकुमार गौतम, मोहम्मद जीशान अख्तर आणि शुभम लोणकर हे तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

दरम्यान, गेल्या एक महिन्यापासून बाबा सिद्दिकींच्या हालचालींवर नजर ठेवून होतो, असे दोन्ही आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत सांगितले आहे. वांद्रे पूर्व येथील आमदार जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर शनिवारी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली होती. दसऱ्यानिमित्त तिथे फटाके फोडत असताना एका गाडीतून तीन जण आले. तिघांचेही चेहरे रुमालाने झाकलेले होते. त्यांनी ९.९ एमएम पिस्तुलातून बाबा सिद्दीकींवर तीन राउंड फायर केले. या हल्ल्यात बाबा सिद्दीकी यांच्या छातीत गोळी लागली, त्यामुळे ते जागीच खाली पडले. बाबा सिद्दीकी यांच्या गाडीच्या विंडशील्डला गोळी लागली. यावरून अनेक गोळ्या झाडण्यात आल्याचे दिसून येते. लीलावती रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, बाबा सिद्दीकी यांना आणले तोपर्यंत त्यांचे बरेच रक्त वाहून गेले होते. 

टॅग्स :बाबा सिद्दिकीमुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस