मुंबई - माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात पुण्यातून १६ व्या आरोपीला अटक केली आहे. गौरव विलास आपुणे (२३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचा कटात सहभाग स्पष्ट होताच कारवाई केली आहे. त्यानेही शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
पुण्यातील कर्वेनगरचा रहिवासी असलेला गौरवला कटाची संपूर्ण माहिती होती. फरार आरोपी शिवकुमार गौतम आणि शुभम लोणकर यांनीही त्याला शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचे तपासात समोर आले आहे. तो यापूर्वी अटक करण्यात आलेल्या रुपेश मोहोळ, शिवम कोहाड, करण साळवे आणि प्रवीण लोणकर यांच्या संपर्कात होता. हत्येसंबंधित झालेल्या बैठकांनाही तो हजर होता. गौरव एका कंपनीत रोजंदारीवर काम करीत होता. सुरुवातीला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे कंत्राट नितीन सप्रे आणि राम कनोजिया यांना देण्यात आले होते. यासाठी गौरवची शूटर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडून त्याला पिस्तूल हाताळण्याचे आणि गोळीबार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे समजते.
एसआरएकडूनही मागविली माहिती - बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामागे एसआरएचा वादाचीही ठिणगी असल्याची चर्चा तसेच आरोप होत आहे.- गुन्हे शाखेकडून आता एसआरए विभागाकडूनदेखील माहिती मागविल्याचे सूत्रांकडून समजते आहे. त्यामुळे याप्रकरणात पडद्यामागील नेमका कुठला चेहरा समोर येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.