'बाबा सिद्दिकींच्या डायरीत सात बिल्डरांसह भाजप नेत्याचं नाव'; झिशान सिद्दिकींच्या जबाबाने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:51 IST2025-01-28T11:49:20+5:302025-01-28T11:51:48+5:30
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात झिशान सिद्दिकी यांनी मुंबई पोलिसांना चौकशीत दिलेली माहिती समोर आली असून, त्यामुळे खळबळ उडाली आहे. झिशान सिद्दिकींना काही नावांचा उल्लेख केला आहे.

'बाबा सिद्दिकींच्या डायरीत सात बिल्डरांसह भाजप नेत्याचं नाव'; झिशान सिद्दिकींच्या जबाबाने खळबळ
Baba Siddique Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर ही माहिती समोर आल्याने प्रकरण तापण्याची शक्यता आहे. बाबा सिद्दिकी हे डायरी लिहायचे. ज्या दिवशी हत्या झाली, त्यापूर्वी काही तास आधी त्यांनी भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांचं नाव लिहिलं होतं. बाबा सिद्दिकींचं मोहित कंबोज यांच्याशी व्हॉट्सअपवरून बोलणंही झालं होतं, असे झिशान सिद्दिकींनी (Zeeshan Siddique) मुंबई पोलिसांना चौकशी वेळी सांगितलं होतं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीव्ही ९ वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्याकडून माहिती घेण्यासाठी चौकशी केली होती. त्यात त्यांनी बाबा सिद्दिकींच्या डायरीचा उल्लेख करत खळबळजनक खुलासे केले होते.
बाबा सिद्दिकींच्या डायरीत मोहित कंबोज यांचं नाव
झिशान सिद्दिकींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील बाबा सिद्दिकी यांना डायरी लिहायची सवय होती. वांद्रे परिसरातील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या कामासाठी ते उभे होते. त्यांचा हे काम करताना काही मोठ्या बिल्डर्संसोबत वाद झाला होता. त्यांनी डायरीत सगळ्या बिल्डर्सची नावे लिहून ठेवली आहेत, असे झिशान यांनी पोलिसांना सांगितले होते.
हत्येच्या दिवशी काय घडले?
झिशान सिद्दिकींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर रोजी, ज्यादिवशी बाबा सिद्दिकींची हत्या झाली. त्याच दिवशी त्यांनी डायरीत एक शेवटचे नाव लिहिले होते, ते नाव मोहित कंबोज यांचं आहे. माझ्या वडिलांचे मोहित कंबोज यांच्यासोबत व्हाट्सअपवर संभाषण झाले होते. संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये बोलणं झालं होतं. पण, मोहित कंबोज यांचं नाव का लिहिलं, हे मी सांगू शकत नाही, असेही झिशान यांनी पोलिसांना सांगितले होते.
झिशान सिद्दिकींच्या माहितीनुसार पोलिसांनी याची उलटतपासणी केली, पण त्यात तथ्य आढळू नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बाबा सिद्दिकींच्या हत्येत लॉरेन्स बिष्णोई गँगला जबाबदार धरण्यात आले आहे.
बाबा सिद्दिकींच्या डायरीत कोणत्या बिल्डरांची नावे?
नागरिकांची बाजू घेतल्याने बाबा सिद्दिकींचा बिल्डर लॉबीसोबत वाद झाला होता, असेही झिशान यांनी पोलिसांना सांगितले होते. त्यांच्या डायरीत बिल्डर पृथ्वी चव्हाण, शाहीद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोएंका आणि ओंकार बिल्डर्सचा उल्लेख आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांचीही भेट बाबा सिद्दिकींनी घेतली होती, असेही झिशान यांनी पोलिसांना सांगितले.
मोहित कंबोज काय म्हणाले?
झिशान सिद्दिकींच्या जबाबातील माहिती समोर आल्यानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी त्यांची भूमिका मांडली.
"बाबा सिद्दिकी यांच्यासोबत माझे चांगले संबंध होते. आमच्यात चांगली मैत्री होती. आम्ही अनेकवेळा अनेक विषयांवर चर्चा करत होतो. त्यांच्या हत्येची बातमी कळताच मला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या कुटुंबासोबत मी देखील रुग्णालयात होतो. या प्रकरणात सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. सत्य बाहेर यायला पाहिजे", अशी मागणी कंबोज यांनी केली आहे.