नवी मुंबईतील चहावाला बाबाच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश
By Admin | Published: August 17, 2015 01:04 AM2015-08-17T01:04:11+5:302015-08-17T01:04:11+5:30
अंद्धश्रद्धा निर्मूलन कायदा होऊनही भोंदूबाबांच्या कारवाया कमी झालेल्या नाहीत. कोपरखैरणे येथील एका चहावाल्या बाबाने करणी - भूतबाधा उतरवण्याबरोबरच
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
अंद्धश्रद्धा निर्मूलन कायदा होऊनही भोंदूबाबांच्या कारवाया कमी झालेल्या नाहीत. कोपरखैरणे येथील एका चहावाल्या बाबाने करणी - भूतबाधा उतरवण्याबरोबरच मूल होण्याचा दावा करीत आहे. त्यामुळे या मांत्रिकी बाबाच्या कथित चमत्काराला भुलून अनेक जण नाडले जात आहेत. याचा परिणाम म्हणून अमावस्या-पौर्णिमेच्या दिवशी या बाबाकडे लोकांची गर्दी होताना दिसत आहे.
महादेव चहावाला असे या मांत्रिकाचे नाव असून, कोपरखैरणे सेक्टर १ मध्ये त्याचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्येच नागरिकांवर मंत्रतंत्राचा वापर करून त्याची भोंदूगिरी सुरू आहे. तो करणी - भूतबाधा उतरवणे अशा प्रकारासह मूल न होण्यावर उपचार करतो. यामुळे त्याच्याकडून उपचार करून घेणाऱ्यांची त्याठिकाणी गर्दी असतेच. शिवाय अमावस्या- पौर्णिमेच्या दिवशीही त्याच्या भेटीसाठी अनेकजण येतात. हा बाबा मूल होत नसलेल्यांना देखील उपचाराची हमी देतो. त्याकरिता अनेक देवी-देवतांच्या नावाच्या अंगाऱ्याचा वापर केला जातो. या भोंदूबाबाची सत्यता जाणून घेण्यासाठी या प्रतिनिधीने त्याच्या ठिकाणाला भेट दिली असता अनेक बाबी समोर आल्या.
नागरिकांना अंधश्रद्धेचे बळी पाडणाऱ्या या महादेव चायवाल्याचा गुरू कोल्हापूरला आहे. त्याचा हा गुरू देखील ठरावीक वेळी कोपरखैरणेत येऊन नागरिकांवर मंत्राद्वारे उपचार करतो. परंतु गुरुविषयीची कसलीही माहिती तो इतरांना देत नाही. मात्र उपचाराच्या नावाखाली एकट्या महिलांना तो गुरूकडे पाठवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या भोंदूबाबांना अनेक महिला बळी ठरल्याची शक्यता आहे. परिसरातीलच एक महिला शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून मूल होण्याकरिता उपचारासाठी या बाबाकडे गेलेली. त्याने काही भेटीनंतर या महिलेला अंतिम उपचारासाठी कोल्हापूरला गुरूकडे एकटीलाच जावे लागेल, असे सांगितले. परंतु गुरूकडे गेल्यानंतर करायला सांगितलेला प्रकार लज्जास्पद असल्याने महिलेने कोल्हापूरला जाणे टाळले. तर जादूटोण्याच्या भीतिपोटी त्याच्याविरोधात जाण्याची भीती या महिलेसह अनेकांनी खाजगीत व्यक्त केली आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या इतर महिला मात्र बळी ठरल्या असतील, अशी शक्यताही पीडित महिलेने व्यक्त केली आहे.
एप्रिलमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत एका उमेदवारानेदेखील या चहावाल्या बाबाचा वापर केला होता. उमेदवाराच्या सांगण्यावरून त्याने एका प्रभागात मंतरलेली हळद, लिंबू उधळून मतदारांमध्ये भीती पसरवलेली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला त्याब्यात घेऊनही नंतर सोडून दिले होते. मात्र योगायोगाने सदर उमेदवार निवडणुकीत विजयी झाल्याने या बाबाचा भाव आणखीनच वधारल्याचे दिसून आले आहे. मंत्रतंत्राद्वारे उमेदवाराला विजयी केल्याचा त्याचा बोलबाला परिसरात सुरू असल्याने इतर नागरिकही त्याच्या जाळ्यात ओढले जात आहेत. त्याच्यावर वेळीच कारवाई करण्याची मागणी होत असली तरी जादूटोण्याच्या भीतीने त्याच्या विरोधात तक्रार करायला कोणीही धजावत नसल्याचे दिसून आले आहे. (प्रतिनिधी)