Join us

बाबासाहेबांनी महिलांना मुख्य प्रवाहात आणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 3:10 AM

बाबासाहेबांनी महिलांना आणि सामान्य जनतेला प्रौढ मतदानाचा हक्क देऊन त्यांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणले

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे सदस्य व मसुदा समितीचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्यावर घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी दिली. डॉ. बाबासाहेब त्या वेळी म्हणाले होते की, मी मसुदा तयार करेन पण त्यात कोणी ढवळाढवळ करता कामा नये. बाबासाहेब अत्यंत बुद्धिमान व द्रष्टे, प्रभावी व राष्ट्रनिर्माते नेते होते. त्यांनी लिहिलेली राज्यघटना आजही तितकीच उपयुक्त आणि समर्पक आहे. बाबासाहेबांनी महिलांना आणि सामान्य जनतेला प्रौढ मतदानाचा हक्क देऊन त्यांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणले, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.मुंबई महापालिकेच्या एफ/दक्षिण विभाग कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती साजरी करण्यात आली; या वेळी रावसाहेब कसबे बोलत होते. याप्रसंगी महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी, उपायुक्त लक्ष्मण व्हटकर, हर्षद काळे, विश्वास शंकरवार, मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे, एफ/दक्षिणचे साहाय्यक आयुक्त किशोर देसाई, एफ/दक्षिण व एफ/उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष सचिन पडवळ, माजी महापौर श्रद्धा जाधव, नगरसेवक सिंधू मसुरकर, ऊर्मिला पांचाळ, दत्ता पोंगडे, भदन्त लंकानंद थेरो, कार्यकारी अभियंता अनिल परमार, दुय्यम अभियंता संजय मोहिते, आयोजक नागसेन कांबळे, विजय कांबळे, श्रीधर जाधव, विजय पडेलकर, जितेंद्र साळुंखे आणि अनिल कदम उपस्थित होते.निधी चौधरी म्हणाल्या की, मी केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच उपायुक्त झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य पाहून थक्क व्हायला होते. आजही काही ठिकाणी स्त्रीला स्वत:चे अस्तित्व नाही. अशा वेळी आपण सर्वांनी मिळून स्त्रीला सन्मान दिला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे.प्रारंभी शिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांनी या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित गौरवपर गीते सादर केली. यानंतर कमला मेहता अंध शाळेतील अंध विद्यार्थिनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या जीवनावर आधारित भाषण दिले. त्यानंतर एफ / दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त किशोर देसाई यांनी प्रास्ताविकातून एफ/दक्षिण विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते उलगडले. या वेळी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकर