आसनगाव : तो काळ १९३० चा. शहापूर तालुक्यातील किन्हवलीचे व्यापारी असलेले चंदुलाल सरूपचंद शहा यांच्याविरु द्ध बेकायदा शस्त्र आणि स्फोटक पदार्थ बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता. खटला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना त्यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी त्यांना या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे शक्य नसल्याचे सांगितल्याने शहा हादरून गेले. यातून आपली सहीसलामत कोण सुटका करेल, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. यावर उपाय म्हणून त्यांना दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या निष्णात वकिलांना भेटण्याचा सल्ला दिला गेला आणि या खटल्यानिमित्ताने शहापूर, ठाण्याशी आंबेडकरांचे नाते जोडले गेले, ते कायमचेच. चंदुलालशेठना लोक दादा म्हणायचे. त्यांनी बाबासाहेबांची दादरच्या घरी भेट घेतली. माणसे ओळखण्याची खास नजर लाभलेल्या डॉ. आंबेडकरांनी अवघ्या दोनच मिनिटांत खटल्याची माहिती घेतली. तारीख विचारून यायचे कबूलही केले. त्या तारखेला डॉ. आंबेडकरांनी ठाण्याच्या सत्र न्यायालयात न्यायाधीशांसमोर अवघ्या दोन मिनिटांत युक्तिवाद केला. तो ऐकून न्यायाधीशांनी चंदुलालशेठ यांची आरोपातून निर्दोष मुक्तता केली. शहा यांनी बाबासाहेबांना फी विचारली. त्यावर, बाबासाहेबांनी केवळ ठाणे ते दादर रेल्वेचे तिकीट काढून देण्यास सांगितले. पुढे १९३० ते १९३८ या काळात शहापूरच्या कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले बाबासाहेबांनी लढवले. शहा यांच्यावरील या खटल्याची आठवण त्यांचे पुत्र कीर्तिकुमार शहा आजही सांगतात. वासिंद येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉ. आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते, ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपली. आता ती कासने येथील विहाराला दान केली आहे. (वार्ताहर)...आणि रस्त्याला दिले नावचंदुलालशेठ यांची केस लढण्यासाठी बाबासाहेब ठाणे न्यायालयात आले होते. त्याच वेळी त्यांनी जवळच्या दलित समाजाच्या वस्तीला भेट देऊन तेथील लोकांशी बातचीत केली होती. त्याचीच आठवण म्हणून त्या परिसरातील रस्त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले आहे.
...बाबासाहेबांनी आरोपातून सोडवले!
By admin | Published: April 14, 2016 12:17 AM