मुंबई - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी २९ जुलै रोजी १०० व्या वर्षात पदार्पण केलं आहे. या निमित्ताने राज्यभरातून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेकांनी त्यांच्या आठवणी सोशल मीडिायातून जागवल्या. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही बाबासाहेबांची भेट घेत त्यांना भगवी शाल, पगडी आणि गुलाबांच्या फुलांचा पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. याचवेळी ठाकरे यांनी पुरंदरेंबद्दल गौरवोद्गार देखील काढले. याचदिवशी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनीही ट्विट करुन बाबासाहेब यांची एक आठवण सांगितली होती.
सत्यजीत तांबे काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत, राज्यात मोठा युवकवर्ग त्यांचा फॉलोअर्स आहे. त्यामुळे, त्यांच्या या ट्विटची दखल सोशल मीडियात चांगलीच घेतली गेली. ''लहानपणी मला थोर माणसांच्या सह्या गोळा करण्याची फार आवड होती. संगमनेरला ज्या अकोलकर वाड्यात माझा जन्म झाला तेथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कायम येत असत. तेव्हाच ही सही घेतलेली. बाबासाहेबांनी आवडीने माझे नाव 'सर्जेराव' असे ठेवले होते. बाबासाहेबांना जन्मशताब्दीदिनी अनंत शुभेच्छा!, असे ट्विट सत्यजीत तांबे यांनी केलं होत. तसेच, बाबासाहेब पुरंदरेंनी केलेल्या सहीचा फोटोही त्यांनी शेअर केला होता.