बाबासाहेब पुरंदरे अपात्र ठरत नाहीत
By Admin | Published: August 20, 2015 02:09 AM2015-08-20T02:09:39+5:302015-08-20T02:09:39+5:30
खेळाडू व कलाकार हे पैशासाठीच काम करीत असतात. त्यामुळे बळवंत मोरेश्वर पुरंदरे (बाबासाहेब) हे केवळ पैशासाठीच काम करीत होते, या मुद्द्यावर त्यांना पुरस्कार नाकारला जाऊ शकत नाही
मुंबई : खेळाडू व कलाकार हे पैशासाठीच काम करीत असतात. त्यामुळे बळवंत मोरेश्वर पुरंदरे (बाबासाहेब) हे केवळ पैशासाठीच काम करीत होते, या मुद्द्यावर त्यांना पुरस्कार नाकारला जाऊ शकत नाही, असे मत व्यक्त करीत उच्च न्यायालयाने पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात दाखल झालेली जनहित याचिका फेटाळली.
पुणे येथील पद्माकर जनार्दन कांबळे व राहुल सदाशिव पोकळे यांनी अॅड़ शेखर जगताप यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली होती. न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळताना कांबळे व पोकळे यांना १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
पुरंदरे यांनी आजवर पैशासाठीच काम केलेले आहे. त्यांनी लिहिलेल्या राजा शिवछत्रपती पुस्तकाविरोधातही कोल्हापूर दिवाणी न्यायलायात दावा सुरू आहे; तेव्हा ते पुरस्कारासाठी पात्र नाहीत, असा दावा अॅड. जगताप यांनी केला. त्यावर न्यायालय म्हणाले, की खेळाडू व कलाकार हे पैशासाठीच काम करीत असतात. पुरंदरे यांच्या लिखाणावर आक्षेप असेल, पण त्यांनी काहीच काम केले नाही असा त्याचा अर्थ होत नाही. पुरंदरे यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. त्यांचे नाटक प्रसिद्ध आहे, असे तुम्हीच याचिकेत लिहिले आहे. असे असताना पुरंदरे यांनी काहीच काम केलेले नाही, असे तुमचे म्हणणे आहे का? आणि पुरंदरे यांना पुरस्कार दिल्यानंतर त्यांच्या कामावर राज्य शासनाने शिक्कामोर्तब करण्यासारखे होईल, असे तुमचे म्हणणे आहे का, असा सवाल न्या. पाटील यांनी केला.
त्यावर अॅड. जगताप म्हणाले की पुरंदरे यांनी काय काम केले आहे, हा आमचा मुद्दा नाही. पण ते या पुरस्कारासाठी का पात्र आहेत व त्यांना हा पुरस्कार का दिला जातोय, याचे स्पष्टीकरण निवड समितीने केलेले नाही. वयाच्या निकषावरून त्यांना पुरस्कार देण्यात येत असेल तर ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार व इतर मान्यवरही वयाने ज्येष्ठच होते, असा युक्तिवाद अॅड. जगताप यांनी केला.
अॅड. जगताप यांचा हा मुद्दाही न्यायालयाने अमान्य केला. न्यायालयात उभयतांची बाजू ऐकल्यानंतरच निर्णयाचे काम न्यायाधीशांवर सोपवले जाते. त्याप्रमाणेच निवड समितीने शिफारस केली. बैठकीत काय चर्चा झाली याचा संपूर्ण तपशील कधीच दिला जात नाही. त्यामुळे पुरंदरे यांच्या केवळ वयाचा मुद्दाच ग्राह्य धरला गेला, असा दावा करणे चुकीचे आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. (प्रतिनिधी)