Join us

बाबासाहेबांची जयंती लालफितीत

By admin | Published: August 14, 2015 2:00 AM

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५वे जयंती वर्ष हे ‘सामाजिक समता व न्याय वर्ष’ म्हणून उत्साहात साजरे करण्याची घोषणा करणाऱ्या राज्यातील

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५वे जयंती वर्ष हे ‘सामाजिक समता व न्याय वर्ष’ म्हणून उत्साहात साजरे करण्याची घोषणा करणाऱ्या राज्यातील भाजपा सरकारने पाच महिने लोटले तरी अजून त्यासंबंधीचा कार्यक्रमच ठरविलेला नाही. आता एक नवीन समिती स्थापन करून घोळ वाढविण्यात आला आहे. डॉ. आंबेडकर यांचे १२५वे जयंती वर्ष १४ एप्रिल २०१५ ते १४ एप्रिल २०१६ या वर्षात साजरे करण्यात येणार आहे. त्यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १२५ कोटी रुपयांची तरतूद वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुरवणी मागण्यांद्वारे केली. मात्र, सामाजिक न्याय विभागाने ही जयंती साजरी करण्यासंदर्भातील कार्यक्रमच अद्याप निश्चित केलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी १२५ कोटी रुपये खर्चाचा एक भरगच्च कार्यक्रम तयार केला. राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तो जाण्याच्या बेतात असताना माशी शिंकली. मंत्री, राज्यमंत्र्यांनी ठरविलेल्या कार्यक्रमाला खो देत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गेल्या आठवड्यात स्थापन करण्यात आली आहे. या समितीत सामान्य प्रशासन विभाग, नियोजन विभाग, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य तर सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य सचिव आहेत. ही समिती समता व सामजिक न्याय वर्षातील कार्यक्रमांची रूपरेषा ठरविणार आहे. समिती ३१ आॅगस्टपर्यंत शासनाला अहवाल सादर करेल. हा अहवाल आल्यानंतर त्यावर आधारित कार्यक्रमाला मंत्रिमंडळाची मंजुरी घेणे, तसा शासकीय आदेश काढण्यात आणखी एखादा महिना जाईल, हे गृहीत धरता या १२५व्या जयंती वर्षातील सहा महिने वाया जाणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)