Join us  

विद्यापीठात उलगडणार बाबासाहेबांचा जीवनप्रवास

By admin | Published: January 20, 2016 2:29 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीचे निमित्त मुंबई विद्यापीठातर्फे बाबासाहेबांचा जीवनप्रवास उलडगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीचे निमित्त मुंबई विद्यापीठातर्फे बाबासाहेबांचा जीवनप्रवास उलडगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानुसार प्रशासनाने १२ व्याख्यानमालांचे आयोजन केले असून, व्याख्यानमालेची सुरुवात २२ फेब्रुवारीपासून होत आहे.आय.सी.एस.एस.आर.चे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात हे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत. यानिमित्ताने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी एका समितीची नेमणूक केली आहे. जयंती उत्सवासाठी या समितीने विविध कार्यक्रमांची आखणीही केली आहे. त्यात फिल्म डिव्हिजनच्या मदतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट उत्सव, विविध स्पर्धा, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा आणि त्यांच्या जीवनावर आणि कार्यावर लिहिलेल्या विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’ या विषयावर ८ दिवसांचा आॅनलाइन सर्टिफिकेट अभ्यासक्रमही राबविणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. आंबेडकर यांची दुर्मीळ छायाचित्रे, महत्त्वाचे दस्तऐवज आणि ग्रंथांचे जतन आणि संवर्धन करून मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील ग्रंथालयात ठेवण्यात येणार असून, त्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. शिवाय बाबासाहेबांसोबत चळवळीत भाग घेतलेल्या अनेक सहकाऱ्यांशी विचार-विनिमय करून त्यांचे अनुभव लिखित स्वरूपात जतन करण्याचेही समितीच्या वतीने निश्चित करण्यात आले आहे.