बाबासाहेबांचे स्मारक दोन वर्षांत पूर्ण होणार; धनंजय मुंडे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 10:40 AM2022-05-12T10:40:37+5:302022-05-12T10:41:08+5:30

आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवासन यांनी इंदू मिल परिसरात करण्यात येणाऱ्या कामांच्या माहितीचे सादरीकरण केले. प्रवेशद्वार, स्मारक इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, प्रेक्षागृह, बेसमेंट वाहनतळ याबद्दल सविस्तर माहिती दिली.

Babasaheb's memorial will be completed in two years; Information of Dhananjay Munde | बाबासाहेबांचे स्मारक दोन वर्षांत पूर्ण होणार; धनंजय मुंडे यांची माहिती

बाबासाहेबांचे स्मारक दोन वर्षांत पूर्ण होणार; धनंजय मुंडे यांची माहिती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दादर येथील इंदूमिल परिसरात उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्धारित वेळेत व अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा काम करीत आहेत. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, मार्च २०२४ पर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण करणे अपेक्षित असल्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

या स्मारकाच्या सद्य:स्थितीबद्दल आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवासन, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, वास्तुविशारद शशी प्रभू, सहसचिव दिनेश डिंगळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवासन यांनी इंदू मिल परिसरात करण्यात येणाऱ्या कामांच्या माहितीचे सादरीकरण केले. प्रवेशद्वार, स्मारक इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, प्रेक्षागृह, बेसमेंट वाहनतळ याबद्दल सविस्तर माहिती दिली. एमआरडीए हे सर्व काम गतीने करत असून, उर्वरित काम गतीने करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बैठकीला उपस्थित असलेले सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांनी स्मारक उभारणीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करीत समग्र आढावा घेतला.

दर पंधरा दिवसांनी अहवाल 
 स्मारक उभारणीसाठी प्रगती तक्ता तयार करून दर पंधरा दिवसांनी या कामाच्या प्रगतीचा अहवाल घेण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती धोरण निश्चितीसंदर्भातील सर्व कार्यवाही पार पाडण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने पाठपुरावा करावा. हे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. 
 स्मारक उभारणीचे काम जरी एम. एम. आर. डी. ए.कडे असले तरी राज्य शासनाने इंदू मिल स्मारक उभारणीच्या संनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे दिलेली आहे. 
 त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षात या कामासाठी लागणारा निधी विहीत वेळेत उपलब्ध करून देणे, वेळोवेळी कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल तपासणे हे काम सातत्याने सुरू आहे. या स्मारकासाठी लागणारा निधी तत्काळ एम. एम. आर. डी. ए.ला वितरित करण्याचे निर्देशही मुंडे यांनी दिले.

Web Title: Babasaheb's memorial will be completed in two years; Information of Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.