Join us

साडेपाच महिन्यांत जन्मलेले बाळ सुदृढ !

By admin | Published: September 12, 2015 2:07 AM

साडेपाच महिने पूर्ण झाले असतानाच गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे तृप्तीने नैसर्गिकरीत्या बाळाला जन्म दिला. २३ आठवड्यात जन्माला आलेल्या बाळाची वाढ पूर्ण झालेली नव्हती.

मुंबई : साडेपाच महिने पूर्ण झाले असतानाच गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे तृप्तीने नैसर्गिकरीत्या बाळाला जन्म दिला. २३ आठवड्यात जन्माला आलेल्या बाळाची वाढ पूर्ण झालेली नव्हती. पण, डॉक्टरांच्या शर्थीने आणि आई-वडिलांच्या इच्छाशक्तीमुळे हे बाळ वाचले. तब्बल चार महिन्यांच्या देखरेखीनंतर या बाळाला ११ सप्टेंबर रोजी घरी सोडण्यात आले. तृप्ती आणि संतोष यांच्या लग्नाला १२ वर्षे पूर्ण होऊनही बाळ होत नव्हते. ५ वेळा गर्भधारणा झाली होती. पण, नैसर्गिकरित्या गर्भपात होऊन बाळ गमवावे लागले होते. याचे दु:ख दोघांनाही होते. त्यानंतर तृप्तीला पुन्हा एकदा गर्भधारणा झाली. अचानक ५ मे २०१५ रोजी तृप्तीची तब्येत थोडी बिघडली आणि गुंतागुंत निर्माण झाल्याने साडेपाच महिन्यांतच तिने एका मुलीला जन्म दिला. साक्षी (बाळ) जन्माला आल्यावर दहाव्या मिनिटाला तिला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्यानंतर तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. इतर औषधोपचारांमुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. सप्टेंबर महिन्यात बाळाचे वजन १.९ किलो इतके झाले. बाळाचे वजन वाढत असल्यामुळे त्याची शारीरिक वाढ होत होती. ज्या अवयवांची वाढ पूर्ण झाली नव्हती. त्या अवयवांची वाढ झाली. बाळाची वाढ पूर्ण झाल्याने ते स्वत: स्तनपान करायला लागले. तिच्यात झालेली सुधारणा पाहून तिला घरी सोडण्यात आले आहे. साक्षी जन्माला आली तेव्हा फुफ्फुसांची वाढ पूर्ण झालेली नव्हती. तिला थोड्या प्रमाणात संसर्ग झाला होता. मेंदूमध्ये रक्तस्त्राव, हाडे कमकुवत होती. पण, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या काळजीमुळे साक्षीने या सर्व गोष्टींवर मात केली. आणि सामान्य मुलांप्रमाणे तिची वाढ झाली. आता ती सामान्य आयुष्य जगू शकते. - डॉ. बी. एस. अवस्थी, संचालक, बालरोगविभाग प्रमुख, सूर्या मदर अ‍ॅण्ड चाईल्ड केअर