लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी ९ किंवा ९ नंतर ठेवावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी काढले. हा आदेश २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून लागू होईल.
हा निर्णय सरकारी, अनुदानित, खासगी अशा सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी लागू राहील. शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असून शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा विचार करावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे. ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी प्रकरण परत्वे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) यांनी मार्गदर्शन देऊन सोडवावी. यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) यांच्याशी संपर्क साधून प्रकरण परत्वे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी, असेही या विभागाने स्पष्ट केले आहे.
पूर्ण अभ्यासाअंती तसेच तज्ज्ञांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला असून यामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होईल आणि ते उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतील. - दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री
शालेय शिक्षण विभागाने अत्यंत योग्य निर्णय घेतला आहे पण केवळ एवढ्याने होणार नाही.मुलांचे मानसिक आरोग्य चांगले करायचे असेल तर मोबाईलच्या वापराविरुद्ध व्यापक चळवळ व्हायला हवी.- डॉ. हरीश शेट्टी, बाल मनोविकार तज्ज्ञ मुंबई.
संस्थाचालकांची संघटना या निर्णयाचे स्वागत करत आहे. मुलांच्या आरोग्याचा विचार करून घेतलेला हा निर्णय योग्य आहे. संस्थाचालकांनी सकाळची शाळा दुपारी करावी व दुपारची शाळा सकाळी करावी.- डॉ. संजय तायडे पाटील, संस्थापक अध्यक्ष ‘मेस्ता‘
का घेतला निर्णय?
nविविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताे. nझोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात. त्यामुळे अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी हाेताे. nपाल्याला लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि वेळेत शाळेत सोडणे यामुळे पालकांची ओढाताण होते. विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी येतात.