Join us

मुंबईत बाबूजीचे स्मारक करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 9:53 AM

स्वातंत्र्यसेनानी, धुरंधर नेतृत्व, व्यासंगी पत्रकार, संपादक असा बाबुर्जीचा उल्लेख करत बाबूजी आणि लोकमत शंभर नंबरी सोनं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाषणात बाबूजींच्या आणि 'लोकमत'च्या आतापर्यंतच्या वाटचालीचा गौरव केला

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडलगत होणाऱ्या उद्यानामध्ये चांगली जागा बघून स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा उर्फ बाबूजी यांचे स्मारक करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जवाहरलाल दर्डा यांच्या १०१ व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्यावरील १०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंगळवारी पार पडले. त्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी बाबूजींच्या कार्याचा आढावा घेतला आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. 

स्वातंत्र्यसेनानी, धुरंधर नेतृत्व, व्यासंगी पत्रकार, संपादक असा बाबुर्जीचा उल्लेख करत बाबूजी आणि लोकमत शंभर नंबरी सोनं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाषणात बाबूजींच्या आणि 'लोकमत'च्या आतापर्यंतच्या वाटचालीचा गौरव केला. देशातल्या कुठल्याही व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत असताना तो कुठल्या पक्षाचा, धर्माचा, आतीचा आहे हा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधीही केला नाही. त्याचाच एक भाग आपण आज पाहतो आहोत. बाबूजींच्या १०० रुपयांच्या नाण्याच्या अनावरणासाठी आयोजित करण्यात आलेला हा कौटुंबिक सोहळा आहे. बाबूजींचे जीवन असेच खणखणीत नाणे होते. जे आजही आपण टिकवून ठेवले आहे. या महान व्यक्तिमत्त्वाच्या अनेक आठवणी आहेत. त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केले ते भाग्यवान आहेत. स्वातंत्र्यसेनानी, मुत्सद्दी राजकारणी आणि पत्रकार असा तिहेरी संगम बाबूजींच्या ठायी होता हे त्यांचे मोठेपण आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बाबूजीच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू, समोर आणले.

यवतमाळ ही वाहूजींची जन्मभूमी, पण त्यांनी आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण देशाला वेगळी ओळख निर्माण करून दिली. आझाद हिंद सेनेच्या शाखेची त्यांनी यवतमाळ येथे स्थापना केली, यंग असोसिएशनची स्थापना केली. आपण देश आणि समाजाला देणे लागती ही बाबूजींची ठाम भूमिका होती. मला काय मिळाले यापेक्षा मी देशाला काय मिळाले असा विचार करणारे बाबूजी होते आणि हेच मोठेपण होते. त्यांनी 'लोकमत' आणि त्या 'नवे जग' हे साप्ताहिक सुरू केले आज लोकमत' ने महाराष्ट्राला माध्यम क्षेत्रात नव्याने दर्शन घडवून आणले आहे. यात विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा बंधूचे मोठे योगदान असल्याचेही मुख्यमंत्री यातेळी म्हणाले.

टॅग्स :जवाहरलाल दर्डाएकनाथ शिंदे