Join us

न्यूमोनिया झालेल्या चिमुकल्याला १५ दिवसांनी मिळाला डिस्चार्ज, सोशल मीडियामुळे मदतीचा ओघ  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 4:51 AM

बाळाच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत गेली. काही दिवसांनी व्हेंटिलेटरवरून त्याला काढले. आता बाळाची प्रकृती ठीक असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई : गोवंडी येथील विकास फलटणकर यांना २१ एप्रिल रोजी मुलगा झाला. न्यूमोनियामुळे प्रकृती गंभीर झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारांसाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी फेसबुकवर मदतीसाठी आवाहन केले होते. त्यांना अनेकांनी मदत केली. आता बाळाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.याबाबत विकास फलटणकर यांनी सांगितले की, गोवंडीमधील शिवाजीनगर येथे रुग्णालयात माझ्या पत्नीने बाळाला जन्म दिला. बाळाला न्यूमोनिया झाला असून प्रकृती गंभीर आहे, त्याला व्हेंटिलेटर आवश्यक आहे, त्यामुळे तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्या रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते. त्या दिवशी रात्री २ ते ४ या वेळेत अनेक रुग्णालयांत फिरलो, पण व्हेंटिलेटरची सुविधा मिळाली नाही. अखेर बाळाला तातडीने चेंबूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु माझ्याकडे केवळ ४० हजार रुपये होते. बाळाचे दोन दिवसांचे बिलच ४० हजार झाले़ बाळाला पुढील उपचारांसाठी जास्त दिवस रुग्णालयात ठेवण्याची गरज होती. मदतीसाठी मी फेसबुकवर मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर शिवराज पंडित यांनी स्वत: रुग्णालयात भेट देऊन विचारपूस केली. तसेच त्यांनी बाळाचा फोटो फेसबुकवर पोस्ट करून मदत करा, असे आवाहन केले. त्यानंतर अनेकांनी मदत केली. बाळाच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत गेली. काही दिवसांनी व्हेंटिलेटरवरून त्याला काढले. आता बाळाची प्रकृती ठीक असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांचे खूप आभार तसेच चेंबूरकरांनी जो मदतीचा हात दिला त्यांचाही खूप आभारी आहे.

टॅग्स :आरोग्यमुंबई