Join us

दादरमधील स्विमिंग पूलमध्ये आढळले मगरीचे पिल्लू, परिसरात एकच खळबळ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 10:56 AM

स्विमिंग पूलाच्या बाजूलाच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून हे मगरीचे पिल्लू आले असेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

मुंबई : दादरमधील महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये आज पहाटे ५.३० च्या सुमारास एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये एका मगरीचे पिल्लू आढळले आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. स्विमिंग पूलाच्या बाजूलाच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून हे मगरीचे पिल्लू आले असेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

दरम्यान, येथील एका कर्मचाऱ्याने मगरीचे पिल्लू पाहिल्यानंतर त्याला पकडून एका ड्रममध्ये ठेवले. तसेच, यासंदर्भात वन विभाग, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन यांना कळवण्यात आले आहे. महात्मा गांधी स्विमिंग पूलच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, बाजूलाच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून हे मगरीचे पिल्लू स्विमिंग पूलमध्ये आल्याचा संशय आहे. याआधी देखील अजगर आणि सापासारखे अनेक प्राणी त्याच प्राणीसंग्रहालयातून बाहेर पडल्याने परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरली होती.  

मगरीचे पिल्लू पकडून वनखात्याच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू आहे. हे मगरीचे पिल्लू स्विमिंग पूलमध्ये कुठून आले, याची चौकशी करण्यात येईल व त्यानुसार आवश्यक ती प्रतिबंधात्मक काळजी भविष्यात घेण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त (उद्यान) किशोर गांधी यांनी दिली. याचबरोबर, याबाबत अधिक माहिती देताना जलतरण तलाव व नाट्यगृहांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी सांगितले की, रोज पहाटे स्विमिंग पूल सदस्यांसाठी सुरू करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांद्वारे स्विमिंग पूलचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात येते. यानुसार आज पहाटे ५.३० च्या सुमारास स्विमिंग पूलचे निरीक्षण करीत असताना ऑलम्पिक आकाराच्या व शर्यतीसाठीच्या स्विमिंग पूलमध्ये मगरीचे पिल्लू आढळून आले. त्यानंतर तज्ज्ञांच्या मदतीने तात्काळ कार्यवाही करीत हे पिल्लू सुरक्षितपणे पकडण्यात आले.

दुसरीकडे, अशा घटना घडत असल्यामुळे प्राणीसंग्रहालयावर कारवाई करावी अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. संदीप देशपांडे म्हणाले, या स्विमिंग पूलच्या बाजूलाच एक प्राणी संग्रहालय आहे.  जे अनधिकृत आहे. त्यातून हे प्राणी बाहेर येतात, आधी अजगर आलेला, साप आलेला, जर कोणाला हे प्राणी चावले तर कोणाची जबाबदारी?  मुळात असे प्राणी पाळायला परवानगी कोणी दिली? कोणाचा राजकीय वरदहस्त या प्राणी संग्रहालयात आहे? ती जागा पालिकेने कोर्टात जिंकली आहे, तरी कारवाई होत नाही. जलतरण तलावाच्या व्यवस्थापनान अनेक वेळा या संदर्भात तक्रार केली आहे, तिथे असल्या प्राण्यांना देखील अतिशय दूरावस्थेत ठेवले जाते मग वनविभाग कारवाई का करत नाही? आज मुंबई आयुक्तांना भेटून हा विषय मी त्यांच्यासमोर मांडणार आहे. 

टॅग्स :मुंबईपोहणेसंदीप देशपांडे