विशाल हळदेमुलुंड- येथील योगी हील, घाटी पाडा पश्चिम परिसरात नाल्यात मगरीचे लहान पिल्लू आढळून आले. यानंतर स्थानिकांनी तात्काळ सर्पमित्र किशोर साळवी आणि चंद्रकांत कांग्राळकर यांना कॉल करुन बोलावले. त्यांनी नाल्यातून मगरीच्या पिलाचे रेस्क्यू केले.
हे पिल्लू सशक्त असून, ५ दिवसांचे असण्याची शक्यता आहे. सतत पडत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे हे जंगलातून नाल्यात वाहत आल्याचा अंदाज आहे. चंद्रकांत कांग्राळकर यांनी वन विभागाचे अधिकारी सदीप मोरे यांना याबाबत माहिती दिली. मोरे यांनी सांगितले की, या मगरीच्या पिलाचे मेडीकल चेकअप करून वन विभागाच्या मान्यतेने निसर्गात सोडण्यात येईल.