तान्हं बाळ रडतंय? तोंडाला चिकटपट्टी लावा! प्रसूतिगृहात नवजात बालकांचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 07:21 AM2023-06-08T07:21:50+5:302023-06-08T07:23:18+5:30

बाळंतपणासाठी आलेल्या महिलांनाही चांगली वागणूक दिली जात नसल्याचे दिसून आले.  

baby crying tape your mouth torture of newborn in maternity hospital | तान्हं बाळ रडतंय? तोंडाला चिकटपट्टी लावा! प्रसूतिगृहात नवजात बालकांचा छळ

तान्हं बाळ रडतंय? तोंडाला चिकटपट्टी लावा! प्रसूतिगृहात नवजात बालकांचा छळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कामाचा कंटाळा करणाऱ्या परिचारिकांकडून पालिकेच्या भांडूप येथील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात नवजात बालकांचा अमानुष छळ होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बाळाच्या रडण्याचा त्रास होत असल्याने त्यांच्या तोंडात चोखणी देऊन नंतर त्यावर चिकटपट्टी लावली जाते. तसेच शी, शू केलेल्या बाळांची दुपटी, डायपरही बदलले जात नाहीत. दूधही नीट पाजले नाही, तसेच बाळंतपणासाठी आलेल्या महिलांनाही चांगली वागणूक दिली जात नसल्याचे दिसून आले.  

भांडूप पश्चिम येथील एलबीएस, मारुती मंदिर रोड येथील प्रसूतिगृह पालिकेने खासगी व्यक्तीला चालविण्यास दिले आहे. तान्ह्या बाळांच्या अतिदक्षता विभागातील (एनआयसीयू) परिचारिकांकडून तेथे उपचारासाठी येणाऱ्या महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असून, नवजात बालकांनाही योग्य प्रकारे हाताळले जात नसल्याच्या तक्रारी होत्या. असाच प्रकार शनिवारी प्रसूतिगृहात घडला. 

भांडूप येथील प्रिया कांबळे यांची या रुग्णालयात प्रसूती झाली. बाळाला कावीळ झाल्याने एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. प्रिया जेव्हा बाळाला पाहायला गेल्या, तेव्हा बाळाला चोखणी देऊन तोंडाला चिकटपट्टी लावल्याचे त्यांना दिसले. ते पाहून त्यांना धक्का बसला. बाळ रडले तरी आवाज येऊ नये म्हणून हा प्रकार केल्याचे त्यांना समजल्यावर त्यांनी ते नातेवाईकांना सांगितले. नातेवाईकांनी मध्यरात्री माजी नगरसेविका जागृती पाटील यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी तेथून तत्काळ डिस्चार्ज घेत बाळाला ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले. 

प्रसूतिगृहातील ही धक्कादायक स्थिती पाहून भाजपच्या माजी नगरसेविका जागृती पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाला फैलावर घेत एस वॉर्डच्या सहायक आयुक्तांना पत्र लिहिले. बाळ रडत असल्यास त्याच्या तोंडाला चिकटपट्टी लावली जाते. बालकांचे डायपरही वेळेत बदलले जात नाहीत. इतकेच काय, तर आईचे दूध वाटीत घेऊन बालकांना पाजतानाही निष्काळजीपणा केला जातो, अशी तक्रार पाटील यांनी केली.
 

Web Title: baby crying tape your mouth torture of newborn in maternity hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.