बेबीचे व्यवहार कोट्यवधींचे

By Admin | Published: April 24, 2015 03:25 AM2015-04-24T03:25:28+5:302015-04-24T03:25:28+5:30

ड्रग माफिया शशिकला ऊर्फ बेबी पाटणकरने गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये वरळी परिसरातील तब्बल २२ बँक खात्यांमधून पाच ते सहा कोटींचे व्यवहार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे

Baby deals billions of billions | बेबीचे व्यवहार कोट्यवधींचे

बेबीचे व्यवहार कोट्यवधींचे

googlenewsNext

जयेश शिरसाट, मुंबई
ड्रग माफिया शशिकला ऊर्फ बेबी पाटणकरने गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये वरळी परिसरातील तब्बल २२ बँक खात्यांमधून पाच ते सहा कोटींचे व्यवहार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विश्वसनीय सूत्रांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी बेबीच्या मुंबई आणि पुण्यातल्या स्थावर मालमत्तेचाही ठावठिकाणा लावला असून तिच्या अन्य मिळकतीचा कसून शोध सुरू आहे.
बडतर्फ पोलीस शिपाई धर्मराज काळोखे हा सातारा व मुंबई पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यातला मुख्य आरोपी आहे आणि बेबी सहआरोपी. सातारा पोलिसांनी त्याच्या गावच्या घरातून ११४ तर मुंबईतल्या मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातील कपाटातून १२ किलो एमडी या अमली पदार्थाचा साठा हस्तगत झाला होता. हा माल बेबीचा असला तरी तो काळोखेच्या ताब्यात मिळाला. अटकेवेळी बेबीकडे मोबाइलव्यतिरिक्त काहीही सापडले नाही. त्यामुळेच न्यायालयीन लढाईत बेबीविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी मधल्या काळात तिच्या मालमत्तेची शोधाशोध सुरू केली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरळी, दादर परिसरात बेबीची तब्बल २२ बँकांमध्ये खाती आढळली. यापैकी तिचे सर्वाधिक व्यवहार हे देना व ओरीएन्टल बँक आॅफ कॉमर्सच्या खात्यावर नोंद आहेत. बेबीने काही दिवसांपूर्वी देना बँकेत तब्बल १ कोटी २० लाख रुपये मुदत ठेव म्हणून भरले. फक्त चार व्यवहारांमध्ये रोखीने तिने ही रक्कम भरली.
बेबी फरार असताना पोलिसांनी या बँकांना पत्र धाडून माहिती मागवली होती. त्यातून ही माहिती पुढे आल्याचे समजते. याशिवाय गेल्या तीनेक वर्षांमध्ये तिने सर्व २२ बँक खात्यांमार्फत पाच ते सहा कोटींची रोख रक्कम भरली व नंतर काढल्याचीही माहिती पुढे आल्याचे समजते.
याशिवाय वरळीच्या सिद्धार्थनगर झोपडपट्टीत १० खोल्या, गोराईत दोन खोल्या, ताडदेवच्या न्यू अंबालाल चाळीत पागडी तत्त्वावर ३४ लाखांना नुकतीच घेतलेली खोली, पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील फ्लॅट, मीरा रोडला देशी दारूचा बार, लोणावळ्यात आलिशान बंगला आणि ती व तिची दोन मुले मालक असलेली सौरव टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनी, कंपनीच्या तीन गाड्या या मिळकतीची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच एमडी विकून आलेल्या पैशांमधून तिने लाखो रुपयांचे दागिनेही विकत घेतल्याची माहिती समोर आल्याचे समजते. न्यायालयात खटला उभा राहिल्यानंतर बचावार्थ बेबी धडपडू शकते. मात्र तेव्हा इतकी मालमत्ता कोणत्या व्यवसायातून गोळा केली, या मिळकतीचा अन्य स्रोत काय या प्रश्नावर बेबीची विकेट पाडण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे समजते. त्यासाठी पोलिसांनी बेबीची पार्श्वभूमी आणि घरच्या परिस्थितीबाबतही माहिती गोळा केली आहे.
रत्नागिरीहून मुंबईत
आलेल्या बेबीचे एकूण पाच भाऊ. त्यापैकी चौघांना खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यातल्या एका भावाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. तिची हत्या झाली असावी, असा संशयही व्यक्त होत आहे. बेबीची दोन मुले सतीश, गिरीश आणि सुना अनुक्रमे सारिका, दीप्ती याही अमली पदार्थ विक्रीत गुंतलेल्या. तिचे भाचेही गुन्हेगार. त्यातला एक बेबीच्याच अड्ड्यावरून गजाआड झालेला तर दुसरा तडीपार आहे.

Web Title: Baby deals billions of billions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.