Join us

मध्य रेल्वेच्या रुग्णालयात बेबी डायपर चेंजिंग स्टेशन; बालकांना होणार फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 10:44 AM

क्लबने पुढाकार घेत बेबी डायपर चेंजिंग स्टेशन केलं दान

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वेच्या भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या बाल रुग्णांच्या पालकांना बाळांचे आणि मुलांचे डायपर सुरक्षितपणे बदलण्यासाठी सुसज्ज क्षेत्राची गरज होती. त्यासाठी एका क्लबने पुढाकार घेत बेबी डायपर चेंजिंग स्टेशन दान केले असून, त्याचा बालकांना फायदा होणार आहे.

भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये बालकांसाठी आवश्यक असलेली डायपर चेंजिंग स्टेशनची गरज ओळखून नरिमन पॉइंट येथील इनरव्हील क्लब ऑफ मुंबईच्या सदस्यांनी स्वेच्छेने हॉस्पिटलच्या दोन वेगवेगळ्या भागांत अशी दोन उच्च दर्जाची बेबी डायपर चेंजिंग स्टेशन दान केले. त्यापैकी एक ओपीडी कॉम्प्लेक्समध्ये आणि दुसरे  इनडोअर वार्डमध्ये बसवण्यात आले आहे. बेबी डायपर चेंजिंग स्टेशन चांगल्या दर्जाचे असून,  डायपर बदलताना मुलाला अचानक हलल्यास कोणतीही दुखापत होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.

इनरव्हील क्लब ऑफ मुंबईच्या अध्यक्षा रीमा कोठारी, सचिव सोनल अग्रवाल, प्रतिष्ठित सदस्य कांता पारेख यांनी  दोन बेबी डायपर चेंजिंग स्टेशन दान करण्याचा संकल्प केला. डॉ. मीरा अरोरा प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक मध्य रेल्वे, डॉ. विजय पिचड मुख्य तज्ज्ञ आणि डॉक्टर, आरोग्य निरीक्षक आणि विविध विभागांचे नर्सिंग इन्चार्ज यांच्या उपस्थितीत दोन्ही ठिकाणी लोकार्पण करण्यात आले.

टॅग्स :मुंबई लोकलरेल्वे