लसीकरणानंतरही बाळाचा गोवराने मृत्यू, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त; एकूण १३ मृत्यूंची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 08:34 AM2022-11-25T08:34:00+5:302022-11-25T08:34:28+5:30
measles : मुंबईतील गोवरच्या साथीची तीव्रता दिवसेंदिवस भीषण होते आहे. दिवसभरात गोवरच्या १९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर शहर उपनगरात गुरुवारी सलग चौथ्या दिवशी गोवरच्या आणखी एका संशयित मृत्यूची नोंद झाली आहे.
मुंबई : मुंबईतील गोवरच्या साथीची तीव्रता दिवसेंदिवस भीषण होते आहे. दिवसभरात गोवरच्या १९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर शहर उपनगरात गुरुवारी सलग चौथ्या दिवशी गोवरच्या आणखी एका संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. गोवंडी येथील अवघ्या आठ महिन्यांच्या मुलाचा बळी गेला आहे. या बाळाचे लसीकरण नियमित असून, मृत्यू झाल्याने वैद्यकीय तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत गोवरच्या रुग्णांची एकूण संख्या २५२ झाली असून, आतापर्यंत एकूण १३ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यातील दोन संशयित मृत्यू असून, तीन मृत्यू मुंबईच्या हद्दीतील नसल्याचे पालिकेने म्हटले आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बाळाचे नियमित लसीकरण झालेले असून, त्याला २० नोव्हेंबरला ताप, पुरळ येऊन श्वसनाचा त्रास उद्भवला. त्यामुळे पालिका रुग्णालयात दाखल केले होते. नंतर विशेष रुग्णालयात दाखल करत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मृत्यूचे कारण मल्टिपल ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम, ब्राँकोन्यूमोनिया आणि गोवर असल्याचे नमूद आहे.
मुंबईमधील स्थिती
दिवसभरात निदान झालेले १९
एकूण संशयित रुग्ण ३६९५
निश्चित निदान झालेले रुग्ण २५२
एकूण घरांचे सर्वेक्षण ४६०३३८८
लसीकरण केलेली बालके २३०३६
दिवसभरात दाखल रुग्ण ३४
डिस्चार्ज झालेले रुग्ण ३६
गोवंडीनंतर कुर्ल्यात उद्रेक
शहर उपनगरात सुरुवातीला गोवंडी परिसरात गोवरचा उद्रेक झाल्याचे दिसून आले.
मात्र, त्यानंतर आता गोवंडीखालोखाल पूर्व उपनगरातील कुर्ला विभागात गोवरचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे दिसून येत आहे.
आतापर्यंत या विभागात २९ रुग्णांची नोंद झाली असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र, संशयित १५० पेक्षा अधिक आहेत.
लसीकरण वेगाने सुरू असून, अधिकच्या जनजागृतीसाठी धर्मगुरू, स्थानिक डॉक्टरांचीही मदत घेत असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे.