मुंबई - एकीकडे पेंग्विनच्या देखभालीचा वाद रंगला असताना भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन कक्षात दोनदा पाळणा हलला आहे. १ मे रोजी जन्मलेल्या पहिल्या बाळाचे नाव ओरिओ ठेवण्यात आले. तर १९ ऑगस्ट रोजी दुसरं बाळ जन्मले आहे. मात्र त्याची लिंग तपासणी केल्यानंतरच त्याचे नामकरण केले जाणार आहे.
राणी बागेतील ही गोड बातमी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी दिली. यापूर्वी २०१८ मध्ये फ्लिपर या मादीने पिल्लाला जन्म दिला होता. मात्र एका आठवड्यातच त्याचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर १ मे २०२१ रोजी जन्मलेला ओरीओ पेंग्विन आता साडेतीन महिन्यांचा झाला आहे. इतर पेंग्विनबरोबर तो आता बागडूही लागला आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे प्राणीसंग्रहालयाकडून सांगण्यात आले.
असा आहे ओरीओ....
ओरीओ पेंग्विन किशोरावस्थेत असून वर्षभरात तो प्रौढावस्थेत दाखल होईल. त्याच्यावर सुरुवातीच्या काळात डॉक्टरांचे सतत लक्ष असे. डोनाल्ड आणि डेसी या पालकांबरोबर त्याला घरट्यात वेगळे ठेवण्यात आले होते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक प्रत्येक दोन तासांनी त्याच्या पालकांना आहार पुरवत होते. दररोज सकाळी पिल्लाचे वजन करुन त्याच्या आहाराबाबत निर्णय घेतला जात होता. पेंग्विनची देखभाल करणाऱ्या डॉक्टरांनीच ओरीओ हे नाव दिले. आता हा पेंग्विन इतर पक्षांबरोबरच राहत आहे. प्रौढ पेंग्विनप्रमाणे मासे आणि इतर आहारही तो घेत आहे. विशेष म्हणजे तो जास्तीतजास्त वेळ बबल या मादीसोबत राहत आहे.
किशोरावस्थेतून प्रौढावस्थेत येण्याची प्रक्रिया पेंग्विनसाठी तणावपूर्वक असते. त्यासाठी काळजी घेतली जाते. कितीही राजकरण केले जात असले तरी हे पेंग्विनच आता मुंबईची ओळख झाली आहे. त्यांची काळजी घेण्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही.
- किशोरी पेडणेकर (महापौर, मुंबई)
आणि फ्लिपर पुन्हा आई झाली...
फ्लिपर या मादीच २०१८ मध्ये पहिल्यांदा प्रजनन झालं होतं. मात्र, अवघ्या आठवडाभरात त्या पेंग्विनचा जन्मजात दोषामुळे मृत्यू झाला. परंतु, तब्बल तीन वर्षानंतर मोल्ट आणि फ्लिपर या जोडीने पुन्हा १९ ऑगस्ट रोजी पिल्लाला जन्म दिला आहे. हे पिल्लू महिनाभराचेही नसल्याने त्याला घरट्यात ठेवण्यात आले आहे.
नव्या बाळाची घेतली जातेय काळजी...
वयाच्या तीन महिन्यांपर्यंत पेंग्विनची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने ते आजारांना बळी पडू शकतात. त्यामुळे ओरिओनंतर आता नव्या पेंग्विनवर डॉक्टरांची पथक २४ तास लक्ष ठेवून आहेत. त्याच्या पालकांना सकस आहार पुरवला जात आहे. तसेच, दररोज सकाळी या नवजात पेंग्विनचे वजन केले जाते. त्याचे पालक संपूर्ण संगोपन करत असल्याने सकाळी फक्त त्याला एक आहार पुरवला जात आहे.