मुंबईत उपचार घेण्यासाठी इराकमधील 'ब्ल्यू बेबी'ने दोन देशांतील अंतर अन् कोरोनाचे आव्हान केले पार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 05:19 PM2020-10-16T17:19:57+5:302020-10-16T17:25:16+5:30
नवजात बालकाच्या जन्मजात हृदयविकारावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
मुंबई: इराकमध्ये जन्मलेल्या व हृदयाच्या जन्मजात विकाराने ग्रस्त असलेल्या एका बालकावर कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. एक महिना वयाच्या या बालकाला ‘डी-टीजीए’ (डेक्स्ट्रो-ट्रान्सपोझिशन ऑफ द ग्रेट आर्टरीज) हा आजार जन्मतःच झालेला होता. कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमधील बाल हृदयरोग चिकित्सा केंद्राचे संचालक डॉ. सुरेश राव यांच्या नेतृत्त्वाखालील तज्ज्ञांच्या पथकाने या बाळावर शस्त्रक्रिया करून त्याच्या हृदयातील दोष काढून टाकला.
‘डी-टीजीए’ या आजारामध्ये, हृदयातून शरीराकडे रक्त वाहून नेणाऱ्या महाधमनी आणि फुफ्फुसीय धमनी या दोन मुख्य वाहिन्या त्यांच्या मूळ जागेवरून सरकून एकमेकींची जागा घेतात. हा दोष सुधारण्यासाठी धमन्या मूळ जागेवर बसविण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. या बाळावर ती करावी लागली, तसेच ‘एट्रियल सेप्टल डिफेक्ट’ (हृदयाला पडलेले छिद्र) हे बुजविण्यासाठीही शस्त्रक्रिया करावी लागली. यातून बाळ बरे झाले. रक्ताभिसरण बिघडल्याने अंग निळसर पडलेल्या आणि आता ते सुधारल्याने गुलाबी झालेल्या बाळाला घेऊन पुन्हा मायदेशी परतण्याची तयारी त्याचे पालक करू लागले आहेत.
डॉ. सुरेश राव याबाबत म्हणाले, रुग्ण असलेल्या या बालकाचे अंग जन्मतःच निळसर होते. त्याच्या हृदयामध्ये गंभीर स्वरुपाची गुंतागुंत असल्याचे निदान झाले होते. थोडक्यात सांगायचे, तर त्याच्या शरीरातील रक्ताभिसरण उलटे होत होते. अशी स्थिती 5 हजार नवजात मुलांमधील एकामध्ये असते. लवकर शस्त्रक्रिया झाली नाही, तर हे मूल दगावते. भारतात नवजात बालके व लहान मुले यांच्यावर अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणे ही नेहमीचीच बाब आहे. इराक या देशात मात्र अशा सोयीचा अभाव असल्यामुळे या बाळावर तेथे उपचार होऊ शकले नाहीत. सुदैवाने, बाळाच्या वडिलांच्या भारतात राहणाऱ्या एका मित्राने त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात येण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार, बाळाचे अहवाल डॉ. सुरेश राव यांच्याकडे पाठवण्यात आले. त्यांनी व चीफ पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी त्या अहवालांचा अभ्यास केला आणि बाळावर शक्य तितक्या लवकर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला त्याच्या पालकांना दिला. मात्र यामध्ये अनेक अडचणी होत्या. ‘कोविड-19’मुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्यामुळे व इतरही काही अडथळ्यांमुळे बाळाला भारतात आणणे अवघड होते. बाळाला वैद्यकीय व्हिसा आवश्यक होता, मात्र त्याचा पासपोर्ट नव्हता. शेवटी इराकमधील भारतीय दुतावासाने मानवतेच्या दृष्टीकोनातून त्याला व्हिसा मिळवून दिला आणि बाळाचे पालक त्याला घेऊन तातडीने भारताकडे निघाले.
डॉ. राव पुढे म्हणाले, बाळावरील शस्त्रक्रियेस उशीर झाला असता, तर ती करूनही उपयोग झाला नसता; कारण रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी हृद्य पुरेसे सशक्त राहिले नसते. बाळाच्या सुदैवाने, इराकमधील एका स्थानिक रुग्णालयात त्याच्यावर ‘बीएएस’ (बलून एट्रियल सेप्टोस्टॉमी) ही प्राथमिक उपचार पद्धती करण्यात आली होती. हृदयाचे कार्य स्थिर होण्याकरीता ती केली जाते. त्या उपचारांना बाळाने चांगला प्रतिसाद दिला होता व त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढली होती. विमानाने भारतात येण्याकरीता त्याची ही स्थिती सहाय्यभूत ठरली.
नवीन पासपोर्ट मिळवणे, इराकमधील भारतीय दुतावासाकडून वैद्यकीय व्हिसा घेणे आणि अखेरीस भारताच्या विमानात जागा पटकावणे ही मोठी आव्हाने बाळाच्या पालकांपुढे होती; तथापि, जबर इच्छाशक्ती आणि दृढ निश्चय यांमुळे या आव्हानांवर त्यांना मात करता आली व ते 24 सप्टेंबर रोजी मुंबईला पोहोचले. येथे आल्यावरही त्यांच्यापुढील अडचणी संपल्या नाहीत. बाळाच्या आईला कोरोना असल्याचे निष्पन्न झाले व तिला विलग करण्यात आले. नशीबाने बाळ व त्याचे वडील यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली. तरीदेखील बाळाच्या वडिलांना आठवडाभर विलग करण्यात आले व बाळाला अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यामुळे त्याच्यावरील उपचार व शस्त्रक्रिया यांना आठवडाभर विलंब झाला.
बाळावरील उपचारांविषयी माहिती देताना डॉ. राव म्हणाले, उपचार घेण्यास उशीर झाल्याने, बाळाच्या हृदयाचा डावीकडील कप्पा किंचित आकुंचन पावला होता आणि तेथील हृदयाची भिंत पातळ झाली होती. शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या आरोग्याबाबत जोखीम निर्माण झाली असती व त्याला अतिदक्षता विभागात बराच काळ ठेवावे लागले असते. त्यामुळे आम्ही अधिक काळ वाट न पाहण्याचे ठरविले. सर्व आवश्यक दक्षता व काळजी घेऊन, तयारीनिशी आम्ही 30 सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया केली. बाळाच्या हृदयाच्या धमन्या पुन्हा त्यांच्या मूळ जागेवर जोडल्या. फुफ्फुसीय धमनी अगदी योग्य अशा रक्तवाहिनीला जोडणे हा यातील फार महत्त्वाचा भाग होता. शस्त्रक्रिया झाल्यावर पहिले 48 तास अतिमहत्त्वाचे असतात. त्यावेळी आवश्यकता भासल्यास, बाळाला ‘इसीएमओ’ (एक प्रकारचा लाईफ सपोर्ट) देण्याचीही तयारी आम्ही ठेवली होती. सुदैवाने, बाळाची प्रकृती शस्त्रक्रियेनंतर उत्तम राहिली आणि केवळ औषधे व अतिदक्षता विभागातील काळजी यांवरच भागले.
‘कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल’चे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष शेट्टी म्हणाले, संबंधित बाळाच्या पालकांपुढे अतिशय मोठी आव्हाने उभी होती. त्यांतूनही मार्ग काढीत मोठ्या आशेने ते इराकमधून कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या बाळावर उपचार करून त्याचा जीव वाचवला, याबद्दल आम्हाला समाधान वाटते. रुग्णाला भारतात उपचारासाठी येण्यात मदत केल्याबद्दल आम्ही सरकारी अधिकाऱ्यांचे आभारी आहोत. ‘कोविड-19’च्या काळातदेखील गरजूंना आरोग्यसेवा पुरविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
रुग्ण बालकाचे वडील तारीक थामर यांनी हर्षभरीत स्वरांत म्हटले, ''आमच्या येथील वास्तव्याच्या काळात मला उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल कोकिलाबेन हॉस्पिटलचे मी आभार मानतो. आम्ही भारतात उतरल्याच्या क्षणापासून सर्व काही नियोजनानुसार घडले. या रुग्णालयाच्या सेवाही अत्युत्कृष्ट आहेत. मी डॉ. सुरेश राव यांचे विशेष आभार मानू इच्छितो. माझ्या एक महिन्याच्या बाळावर त्यांनी अवघड शस्त्रक्रिया केली, जी माझ्या देशात उपलब्ध नव्हती. आम्ही इराकला गेल्यानंतरही मी त्यांच्याशी सतत संपर्कात राहीन.''
इराकचे हे बाळ सध्या अगदी स्वस्थ आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याच्या चिंतामुक्त, आनंदी पालकांना प्रवासाचे सर्व सोपस्कार पूर्ण होऊन घरी परतण्याची ओढ लागली आहे.