मुंबई - केईएम रुग्णालयात प्रिन्स राजभर या चार महिन्यांच्या चिमुकल्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या हृदयाला छिद्र असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. 7 नोव्हेंबर रोजी या रुग्णालयातील ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत प्रिन्सला हात गमवावा लागला. काही दिवस प्रिन्सची प्रकृती चिंताजनक होती. मात्र गुरुवारी मध्यरात्री प्रिन्सचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रिन्सची प्रकृती गुरुवारी खूपच खालावली होती. त्याचा रक्तदाब खूप खाली गेला होता. रात्री 2.30 वाजता त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला. प्रिन्सच्या वडील पन्नीलाल रामजी राजभर हे उत्तर प्रदेश येथे राहतात. त्यांचा मुलगा प्रिन्स यास जन्मताच श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने व तपासणीत त्याचे ह्रदयास छिद्र असल्याने त्यास नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी केईएम रुग्णालयात 5 नोव्हेंबर रोजी दाखल केले होते.
प्रिन्सवर उपचार सुरू असतानाच अतिदक्षता विभागातील मॉनिटरच्या वायरमध्ये शॉर्टसर्किट होऊन त्याचा हात भाजला. 11 नोव्हेंबरला उपचारादरम्यान ऑपरेशन करून मुलाचा डावा हात दंडातून कापण्यात आला. याप्रकरणी प्रिन्सच्या वडिलांनी भोईवाडा पोलीस ठाणे येथे येऊन मॉनिटरचे व विद्युत उपकरणांची देखभाल करणारे जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांचे निष्काळजीपणामुळे त्यांचा मुलगा प्रिन्स याच्या डाव्या हाताला व बोटाला रक्तपुरवठा होत नसल्याने डावा हात निकामी झाल्याने दंडातून काढून टाकण्यास कारणीभूत झाल्याने त्यांच्याविरूध्द तक्रार दाखल केली. पालिकेत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. पालिका रुग्णालयात ही दुर्घटना घडल्याने त्याला आर्थिक मदत देण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली. मात्र पालिका प्रशासनाने पाठवलेला पाच लाखांचा धनादेश राजभर कुटुंबाने नाकारला.
महापौर दालनात बोलाविलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. प्रिन्सच्या उदरनिर्वाहासाठी 10 लाखांची मदत करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या प्रस्तावावर आयुक्त प्रवीण परदेशी यांनीही शिक्कामोर्तब केले. त्यानुसार पाच लाखांचा पहिला धनादेश देण्यात येईल. तर पाच लाख रुपये प्रिन्सच्या नावाने बँकेत ठेवण्यात येतील, जेणेकरून त्यावरील व्याजात प्रिन्सला उदरनिर्वाह करता येईल, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले होते. मात्र उपचारादरम्यान प्रिन्सचा मृत्यू झाला आहे.