बाळ विकणारी ज्युलिया क्राइम ब्रँचच्या ताब्यात; सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 08:34 AM2023-10-05T08:34:35+5:302023-10-05T08:34:51+5:30
बाळ विक्री रॅकेटमधील मास्टरमाइंड ज्युलिया फर्नांडिस हिच्यासह तिच्या साथीदारांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हे शाखा तिचा ताबा घेणार आहे.
मुंबई : बाळ विक्री रॅकेटमधील मास्टरमाइंड ज्युलिया फर्नांडिस हिच्यासह तिच्या साथीदारांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हे शाखा तिचा ताबा घेणार आहे.
ज्युलिया फर्नांडिसविरोधात मुंबईसह ठाण्यात बाळ चोरी, विक्री प्रकरणी गुन्हे नोंद आहेत. ट्रॉम्बे पोलिसांनी बाळ विक्री रॅकेट प्रकरणी तिच्यासह बोगस डॉक्टर सायाराबानो आणि दलाल महिलांना अटक केली. पाच लाखांत नवजात बालकाची विक्री करण्याचा डाव पोलिसांनी उधळला. ट्रॉम्बे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद नाणेकर यांनी ज्युलियाचा नर्सिंग होमच्या माध्यमातून सुरू असलेल्या बाळ चोरी रॅकेटचा पर्दाफाश केला. ज्युलियाने सोनोग्राफी सेंटरसाठी अर्ज केला आहे. तेदेखील रद्द करण्याबाबत पोलिसांकडून पाठपुरावा सुरू आहे.
दुसरीकडे ज्युलियासह तिच्या साथीदार महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष १ च्या बाळ विक्री संबंधित गुन्ह्यात तिने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये नुकताच तिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने गुन्हे शाखा तिचा ताबा घेणार असल्याची माहिती ट्रॉम्बे पोलिसांनी दिली. ज्युलियाच्या चौकशीत काय समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.