आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाला कारने चिरडले; वडाळ्यात हिट अँड रन : कारचालक महिलेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 09:14 IST2025-02-24T09:13:59+5:302025-02-24T09:14:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वडाळा येथील बाळाराम खेडेकर मार्गाच्या फूटपाथवर झोपलेली महिला आणि तिच्या दीड वर्षाच्या बाळाला एका ...

आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाला कारने चिरडले; वडाळ्यात हिट अँड रन : कारचालक महिलेला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वडाळा येथील बाळाराम खेडेकर मार्गाच्या फूटपाथवर झोपलेली महिला आणि तिच्या दीड वर्षाच्या बाळाला एका चालकाने शनिवारी रात्री भरधाव कारखाली चिरडले. या अपघातात दीड वर्षांचा वरदान लोंढे याचा मृत्यू झाला, त्याची आई प्रिया लोंढे (२९) गंभीर जखमी झाली. याप्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी कारचालक कमल रियाला (४६) अटक केली आहे.
वडाळा गाव येथील गारुडी समाज झोपडपट्टीत प्रिया राहते. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झोपडीसमोरच्या फुटपाथवर प्रिया वरदानला घेऊन झोपी गेली. अंगावरून कार गेल्यानंतर जायबंदी अवस्थेत त्यांना जाग आली. आपल्या आणि बाळाच्या अंगावरून कार गेल्याचे कळताच हंबरडा फोडला. काही वेळाने गाडीखाली चिरडलेल्या बाळाला माझ्याकडे आणून दिल्याचे प्रियाने पोलिसांना सांगितले.
विरुद्ध दिशेला ड्रायव्हिंग
प्रिया आणि तिच्या बाळाच्या अंगावर घातलेली कार विरुद्ध दिशेने वडाळा उद्योग भवनकडे गेली. स्थानिकांनी कार चालकाला अडवून ताब्यात घेतले. तो वडाळा भव्य हाईट्स येथे राहत असल्याचे सांगण्यात येते. कारखाली चिरडून गंभीर जखमी झालेला मुलगा हालचाल करीत नव्हता. नातेवाइकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. त्याला मृत घोषित करण्यात आले.