वरळी पोलिसांच्या कार्यामुळे आई आणि बाळ सुखरूप
पोलीस वाहनातच दिला बाळाला जन्म
वरळी पोलिसांमुळे आईसह बाळ सुखरूप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वरळी नाका परिसरात एक तरुणी चक्कर येऊन पडल्याचा कॉल येताच, वरळी पोलिसांनी तेथे धाव घेतली. तात्काळ तरुणीला पोलीस वाहनात बसवून ते रुग्णालयाच्या दिशेने निघाले. प्रवासात ती गर्भवती असल्याचे समजताच, पोलिसांनी तिला धीर देत मानसिक आधार दिला. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी तिने वाहनातच बाळाला जन्म दिला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. वरळी पोलिसांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अपेक्षा कांबळे (२७), असे तरुणीचे नाव असून, ती जिजामातानगर परिसरात राहते. मंगळवारी पोटात दुखू लागल्यामुळे ती पतीसोबत पोद्दार रुग्णालयाकडे जाण्यासाठी निघाली होती. रुग्णालयात तिच्यासोबत कोणीतरी असावे म्हणून, तिला वरळी नाका येथे थांबवून पती आईला आणण्यासाठी घरी गेले. त्यातच तिचा त्रास वाढल्याने स्थानिकांनी पोलिसांना कळविले.
मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास याबाबतचा कॉल धडकताच वरळी पोलिसांचे पथक तेथे गेले. जवळ नातेवाईक नसल्यामुळे तरुणीला काय झाले, हे समजत नव्हते. कोरोनाच्या भीतीमुळे अन्य नागरिक मदतीसाठी पुढे येण्यास तयार नव्हते. त्यात प्रिया जाधव नावाची तरुणी सोबत आली. तरुणीला तात्काळ पोलीस वाहनात झोपवून पथक पोद्दारच्या दिशेने रवाना झाले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रेश्मा पाटील आणि अंमलदार सकपाळ तिच्या जवळ होत्या. तरुणीने ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगून प्रसूती कळा सुरू झाल्याचे सांगितले. पोद्दार रुग्णालयात कोविड सेंटर सुरू केल्यामुळे पोलिसांचे वाहन नायर रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले.
रुग्णालयापर्यंत वाट पाहणे शक्य नव्हते. तरुणीला पोलिसांनी धीर देण्यास सुरुवात केली. तोपर्यंत अन्य सहकाऱ्यांनी नायर रुग्णालयात कळविले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तरुणीची पोलीस वाहनातच प्रसूती झाली. पोलिसांनी तात्काळ तरुणीला आणि बाळाला नायर रुग्णालयात दाखल केले. ७ महिन्यांची गरोदर असल्याने बाळाला दक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
* नोकरीचा तिसरा दिवस अन् तरुणीची प्रसूती
मूळचा कोल्हापूरचा रहिवासी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक रेश्मा पाटील यांची पहिली पोस्टिंग वरळी पोलीस ठाणे येथे ९ एप्रिल रोजी त्या कर्तव्यावर हजर झाल्या. त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, महिलेला त्रास होत असल्याचा कॉल येताच आम्ही तेथे पोहोचलो. महिला बारीक असल्यामुळे ती गर्भवती असल्याचे समजले नाही. मात्र, जेव्हा तिने गर्भवती असल्याचे सांगितले तेव्हा तात्काळ काही तरी पावले उचलणे गरजेचे होते. आम्ही तिला धीर देत नायरच्या दिशेने रवाना झालो. त्यापूर्वीच तिने बाळाला जन्म दिला. ती आणि बाळ सुखरूप असल्यामुळे आम्हीही सुटकेचा निःश्वास टाकला. दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमचा गुढीपाडवा खऱ्या अर्थाने साजरा झाल्यासारखे वाटले.
....
या पथकाची कामगिरी...
यात, पोलीस उपनिरीक्षक रेश्मा पाटील यांच्यासोबत
अंमलदार माने, वळवी, कांबळे, लोहार, सपकाळ यांच्यासह स्थानिक तरुणी प्रिया जाधव होती. या पथकाच्या कामगिरीमुळे आई आणि बाळ सुखरूप आहे.
.....