मुंबई : बालहक्क संरक्षण आयोगाने १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना गोविंदा पथकात सहभागी करून घेण्यास बंदी घातल्यामुळे बाळगोपळ हिरमुसले आहेत. आम्ही स्वत: हा खेळ खेळतो, आम्हाला न विचारता, आमची बाजू ऐकून न घेता आयोगाने हा निर्णय एकतर्फी दिला आहे. यामुळेच बाळगोपाळ नाराज जरी झाले असले तरी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे बाळगोपाळांचे म्हणणे आहे. या निर्णयात आम्ही महत्त्वाचे आहोत, कारण प्रत्यक्षात आम्ही खेळाडू (बाळगोपाळ) आहोत. या निर्णयाला आमचा विरोध आहे. कारण येथे आमची बाजूच आम्हाला मांडायला मिळालेली नाही. आम्ही हा निर्णय बदलावा यासाठी सरकारला पत्र पाठवणार आहोत. आमच्यावर त्यांनी बंधने घालावीत, मात्र बंदी नको. आम्ही सर्वच लहान मुलांची काळजी घेतो. यामध्ये आम्ही कुठे कमी पडत असू तर नक्की काय करावे, याविषयी आयोगाने आम्हाला मार्गदर्शक तत्त्वे आखून द्यावीत. त्याचे आम्ही नक्कीच पालन करू, असे दहीहंडी समन्वय समितीचे कार्यकर्ते बाळा पडेलकर यांनी सांगितले.आम्हाला हा निर्णय मान्यच नाही. आम्ही ५ वर्षांखालील मुलांना आमच्या पथकामध्ये घेत नाही. लहान मुलांना आम्ही वरच्या थरावर चढवतो, तेव्हा जबरदस्ती करत नाही. त्यांची मानसिक तयारी झाल्यावरच त्यांना वरच्या थरावर चढवतो. आम्ही यंदा सात थर लावण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजे महिला दहीहंडीचा हा विश्वविक्रमच होऊ शकतो. आमचा सराव सुरू झाला आहे, या वेळी अनेक पालक १२ वर्षांखालील मुलींना आमच्याकडे आणतात. एकीकडे खेळाचा दर्जा देणार असे म्हणतात. मग असा दुजाभाव का करायचा? आम्ही वरच्या थरावर चढणाऱ्या मुलांना जॅकेट, हेल्मेट देतो. आजकाल पुली पण बांधतात. या सगळ्या गोष्टी पाळत असताना असे निर्बंध घालणे कितपत योग्य आहे, असे स्वस्तिक महिला दहिकाला पथकाच्या संचालिका आरती बारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बाळगोपाळ हिरमुसले...
By admin | Published: July 19, 2014 1:25 AM