Join us

लहानग्यांना घेऊन मतदान करणे आता आईला होणार सोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 3:00 PM

लहान मूल असल्याने मतदानाला कसे जाणार अशी अडचण असणाऱ्या महिलांसाठी मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयाने विशेष सुविधा उपलब्ध केली आहे.

ठळक मुद्देलहान मूल असल्याने मतदानाला कसे जाणार अशी अडचण असणाऱ्या महिलांसाठी मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयाने विशेष सुविधा उपलब्ध केली.मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 मतदार संघांतील 1026 मतदान केंद्रांच्या ठिकाणी पाळणाघरांची सुविधा.तान्हुल्यांचे देखील संगोपन याठिकाणी अंगणवाडी सेविकांतर्फे करण्यात येणार आहे.

मुंबई - लहान मूल असल्याने मतदानाला कसे जाणार अशी अडचण असणाऱ्या महिलांसाठी मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयाने विशेष सुविधा उपलब्ध केली आहे. महिलांना आपल्या लहानग्यांना घेऊन मतदानाचा सर्वोच्च अधिकार बजावता यावा यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 मतदार संघांतील 1026 मतदान केंद्रांच्या ठिकाणी पाळणाघरांची सुविधा करण्यात आली आहे. अगदी तान्हुल्यांचे देखील संगोपन याठिकाणी अंगणवाडी सेविकांतर्फे करण्यात येणार आहे. 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या दृष्टीने ही महत्त्वाची सुविधा ठरेल.

प्रत्येक पाळणाघरात लहानग्यांना सांभाळण्यासाठी किमान 1 अंगणवाडी सेविका आणि मतदान केंद्रांच्या संख्येनुसार एकाहून अधिक सेविकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे स्वीप नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सोनाली मुळे यांनी आज सांगितले आहे. याठिकाणी केवळ सेविकाच नाही तर लहानग्यांना खेळण्यासाठी काही खेळणी, कोरडा खाऊ आणि पाणी याचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या अनोख्या सुविधेमुळे महिला आपल्या पाल्यांना पाळणाघरात ठेऊन निश्चितपणे मतदानाचा अधिकार बजावू शकतात. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक बालकाची नोंद अंगणवाडी सेविका ठेवणार असून प्रत्येक पाळणाघराबाहेर पोलीस दलातील सुरक्षारक्षकही तैनात करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील आकडेवारीनुसार, एकूण मतदार संख्या 72 लाख 63 हजार 249 इतकी आहे. तर महिलांच्या संख्येतही यंदा लक्षणीय वाढ झाली असल्याचे नुकत्याच आलेल्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. यामध्ये 33 लाख 15 हजार 336 महिला मतदार आहेत. मे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महिला मतदारांच्या संख्येत 1.78 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मतदान