Join us

"शरद पवार कधी काय करतील हे अजितदादांना समजलं नाही, तर आम्हाला काय समजणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 2:13 PM

Maharashtra News : शरद पवार नेमकी कधी काय भूमिका घेतील हे सगळ्यांनाच संभ्रमात टाकणारं आहे.

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. अनेक महापालिका आणि नगरपालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्याचे चित्र आहे. या नव्या सत्ता समीकरणामुळे शत प्रतिशत भाजपाचा संकल्प धुळीला जात असल्याचे संकेत मिळत आहेत. शरद पवार आणि संजय राऊत या महाविकास आघाडीचे शिल्पकार असल्याचं बोललं जातंय. परंतु शरद पवार नेमकी कधी काय भूमिका घेतील हे सगळ्यांनाच संभ्रमात टाकणारं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट असलं तरी पवारांच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे हे कोणीही सांगू शकत नाही.शपथविधी होत नाही तोपर्यंत भीती आहे, शरद पवार कधी काय करतील हे अजितदादांना कधी समजलं नाहीत, तर आम्हाला काय समजणार, असं विधान प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर भाजपाकडून मला निमंत्रण आलं होतं, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन करणार असल्यानं शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडूंनी नेमकं पवारांच्या भूमिकेवरच बोट ठेवलं आहे. पवार कधी काय करतील याचा कोणालाही अंदाज लागत नाही. त्यामुळे लोकांच्या डोक्यात पवारांची भीती असल्याचंही ते म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सत्ता कशी स्थापन करणार हे शिवसेना-भाजपला विचारा, असं वक्तव्य करून शरद पवारांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी दिलेल्या प्रतिक्रियेला महत्त्व प्राप्त झालं आहे.  

  • काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी नव्हती

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची मानसिकता नाही. शिवसेना-भाजपाची सत्ता येईल, त्यादृष्टीने पाठिंबा दिला होता. कालांतराने राजकारण बदललं, त्यामुळे हा बदल स्वीकारावा लागला. हे राजकारण आहे, इथे काहीही होऊ शकते. पण जे काही होत आहे, ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी होत असेल हाच विचार करून पुढे जायचं असल्याचं ते म्हणाले आहेत. 

  • उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आनंदच

मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे, सुभाष देसाई अशा अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत. यासंदर्भात विचारलं असता, कोण मुख्यमंत्री होणार, यापेक्षा कोणासाठी मुख्यमंत्री होणार हे पाहायचं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल, असंही ते म्हणाले आहेत.  

टॅग्स :बच्चू कडूमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019शिवसेनाभाजपामहाराष्ट्र सरकार