मुंबई - शिंदे गटात सहभागी झालेले माजी मंत्री आणि सर्वसामान्यांचा नेता म्हणून ओळख असलेल्या आमदार बच्चू कडू यांनी विशेष पद्धतीने आषाढी एकादशी साजरी केली. आषाढीनिमित्त ते पुन्हा एकदा वृद्धांच्या सेवेत दिसून आले. कडू यांनी आषाढी एकादशी निमित्त मुंबई येथील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल येथील आनंद निकेतन वृद्धाश्रम येथे भेट दिली आणि वृद्ध, अपंगांचे पाद्यपूजन करुन त्यांना कपडे व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. त्यानंतर, त्यांनी मुंबईती एका रक्तपेढीला भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी, मुंबईतील पहिला प्रवास हा सेवा हेतूनेच घडल्याचं त्यांनी सांगितलं.
बच्चू कडू यांनी मुंबईतील कडू-गोड आठवणींना उजाळा देत वयाच्या 16 व्या वर्षी आपण मुंबईत आल्याची आठवण सांगितली. मी मुंबईत सेवेसाठीच पहिलं पाऊल ठेवलं आणि सेवेसाठीच शेवटचं पाऊल असेल, असे त्यांनी म्हटलं आहे. आयुष्यात पहिल्यांदा मी १९८९ला मुंबईत पहिला पाय ठेवला तो रुग्ण सेवेसाठी वयाच्या १९ व्या वर्षी मित्राचा जिव वाचविण्याकरिता. तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा खिशात गोटे भरुन पोटभर पाणी पिऊन रक्तदान केले. पहिल्यांदा रक्तदान करताना जिवाची भिती होती. परंतु, मित्राचा जीव महत्वाचा होता. मुंबईत अनेकजण राजकीय हिताकरीता येतात, मी सेवेकरीता आलो. पहिले पाऊल सेवेकरीता होते व शेवटचे पाऊलदेखील सेवेचे राहणार आहे, असे बच्चू कडूंनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून सांगितले.
सत्तेतून सेवा हेच ध्येय
सत्ता हे ध्येय नसुन सत्तेतून सेवा हे ध्येय आहे. त्या काळात खासगी ब्लड बँक हा प्रकार नव्हता. मुंबई येथे रक्ताचा प्रचंड तुटवडा होता व लोकांमधे रक्तदानाची जागरूकता नव्हती. त्या काळात इंगोले सर मुंबईवरुन अमरावतीला रक्तदान शिबीराकरीता येत असे. १९९८ ते २००४ पर्यत जवळपास ६००० ब्लड बॅग आम्ही अमरावतीवरुन मुंबईला पाठवले. त्यानंतर अनेक खासगी ब्लड बॅँक सुरू झाल्या व रक्ताचा थोडा तुटवडा कमी झाला. आषाढी एकादशी निमीत्त आम्ही जिथे काम केले त्या लोकांचा सत्कार करण्याकरीता पोहचलो. यावेळेस इंगोले सरांनी आठवणींना उजाळा दिल्याचे कडू यांनी म्हटले.
वृद्धाश्रमातील भेटीनंतर बच्चू कडूंचे ट्विट
"हिच माझी पंढरी, हे माझे विठोबा रखुमाई" असे म्हणत आपली आषाढी इथेच साजरी झाली असल्याचे सांगितले. आज आषाढी एकादशीनिमीत्त मुंबई येथील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल येथील आनंद निकेतन या वृद्धाश्रम येथे भेट दिली. आमच्यातर्फे आषाढी एकादशीनिमीत्त वृद्ध आणि अपंगाना कपडे व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले, असे बच्चू कडू यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.