मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा गेले ३८ दिवस रखडलेला विस्तार अखेर आज सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास राजभवन येथे पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. एकनाथ शिंदे गटाच्या 9 आणि भाजपच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना त्यांनी अजूनही आशा असल्याचं मत व्यक्त केल.
आमचं सरकार हे शेतकऱ्यांसाठी चागंलं काम करत आहे. मै अभी कॅबिनेट से कमी नही हूँ, बच्चू कडू अकेलाही काफी है सबके लिए. मला मंत्रीपद दिलं तरी चांगलं आणि नाही दिलं तरी त्यापेक्षा चांगलं, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर दिली आहे. आमचा उद्देश मंत्रीपदासाठीचा नाही, मी एवढा लहान विचारांचा माणूस नाही. आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मंत्रीपदाचा शब्द दिला आहे, तो शब्द ते नक्की पूर्ण करतील एवढा विश्वास आहे. मात्र, नाही दिलं तर भांडायचं का? असेही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे
“राजकारणात गोपनीयता ठेवावी लागते. त्यात काही उघडपणे सांगितलं जात नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला आहे. येणारा जो विस्तार होईल तेव्हा स्थान मिळेल. आम्ही शब्द दिला आहे असं त्यांनी सांगितलं. आता काही तांत्रिक कारणं असतील. काही पावलं मागे घेणं, पुढे जाणं, त्याग करणं अशा गोष्टींशिवाय राजकारण मजबूत होत नाही हे आम्हाला माहित आहे. ते आपल्या शब्दावर ठाम राहतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मंत्रीपद आमच्या हक्काचं, ते मिळणारच
''फार महत्त्वाचे निर्णय केले पाहिजे त्यासाठी आम्ही आग्रही राहू. मंत्रीपदाचा विषय तो आमचा हक्क आणि तो आम्ही मिळवणारच. त्याबद्दल शंका नाही. ते आम्हाला मिळणारही आहे,” असे बच्चू कडू म्हणाले. हे सरकार मित्रपक्ष आणि अपक्षांशिवाय राहू शकत नाही. त्याचा विचार व्हावा'' असं आपलं मत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केल. एका मराठी वृत्तवाहिनीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
शिंदे गटाकडून पहिल्या टप्प्यात
शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपाकडून पहिल्या टप्प्यात
गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, विजयकुमार गावित यांना संधी देण्यात आली आहे.