मुंबई-
बच्चू कडू माझ्या एका फोनवर आणि माझ्या शब्दावर गुवाहटीला गेले होते, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात येऊ घातलेले प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि केंद्रानं महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक क्लस्टर प्रकल्प मंजुर केल्याची माहिती देण्यासाठी फडणवीसांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यात फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादावरची महत्वाची माहिती दिली.
“महाराष्ट्रात येणारा गुंतवणुकीचा बाप कुणी रोखला”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
"बच्चू कडू माझ्या एका फोन कॉलवर गुवाहटीला गेले होते. त्यांना मी स्वत: फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचं आहे. तुम्ही आम्हाला हवे आहात आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रूपमध्ये यावं. माझ्या एका कॉलवर ते गुवाहटीला गेले. त्यामुळे बच्चू कडूंनी कुणाशी सौदा केला. काही उलटसुलट केलं असा आरोप करणं चुकीचं आहे. बाकी इतरांचं मी काही म्हणत नाही. इतरांनी कुणी सौदा केला असं माझं म्हणणं नाही. पण माझ्या फोनवर गेलेले एकटे बच्चू कडू आहेत. माझी ही पक्की माहिती आहे की जे लोकं गुवाहटीला गेले ते सर्व एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवूनच गेले होते. कारण त्यांना याची कल्पना होती की उद्या जर आवश्यक संख्या नसली तर आपलं पद देखील जाऊ शकतं", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. गेल्या काही दिवसापासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादात राज्याच्या प्रमुखांनी लक्ष घालत दोघांना भेटीसाठी बोलावलं होतं. याचीही माहिती फडणवीसांनी आज दिली.
"बच्चू कडू आणि रवी राणा या दोघांनाही आम्ही बोलावलं होतं. यात रवी राणा यांनी मान्य केलं की ते संतापात बोलले. तर बच्चू कडू यांनीही त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे रागाच्या भरात वक्तव्य केली गेली. रवी राणा यांनी त्यांच्यासमोरच त्यांनी केलेले आरोप मागे घेतले आणि आता दोघांनीही ठरवलंय की विकासासाठी काम करायचं. शाब्दीक कोट्या करुन राज्याचं भलं होणार नाही. हा विषय आता संपलेला आहे. दोघांनीही आपली स्टेटमेंट दिली आहेत. विरोधकांनी राज्याची बदनामी करण्याचं काम हाती घेतलं आहे. पण हे जेवढे बदनामी करतील तेवढं मी यांना उघडं पाडेन", असं फडणवीस म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"