मुंबई - नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार यांना न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आपली आमदारकी गमवावी लागली आहे. काँग्रेसला हा विदर्भात मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे त्यांना शिक्षा सुनावल्याच्या दुसऱ्याचदिवशी त्यांची आमदारकी रद्द करण्यात आल्यामुळे काँग्रेसने भाजपावर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दोन आमदारांच्या नावाचा उल्लेख करत भाजपावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.
नागपूर विशेष न्यायालयाने शुक्रवारी जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी केदार यांना शिक्षा सुनावल्यांतर दुसऱ्याच दिवशी केदार यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना विधिमंडळ सचिवालयाने प्रसिद्ध केली. केदार यांना शिक्षा सुनावण्यात आल्याच्या २२ डिसेंबर २०२३ या दिवसापासूनच आमदारकी रद्द करण्याबरोबरच त्यांचा सावनेर विधानसभा मतदारसंघही रिक्त झाल्याचेही जाहीर करण्यात आले. त्यानंतर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त करत भाजपला लक्ष्य केलं आहे.