बदलत्या जीवनशैलीमुळे वाढताहेत पाठीचे आजार, आंतरराष्ट्रीय परिषदेतील सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 10:43 AM2022-09-18T10:43:38+5:302022-09-18T10:44:47+5:30
पाठीच्या कण्याच्या तज्ज्ञांच्या ‘न्यूरो स्पायनल सर्जन्स असोसिएशन’ या संस्थेच्या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा आरंभ शुक्रवारी झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जीवनशैलीतील बदलांमुळे तसेच सुस्त जीवनपद्धतीमुळे पाठीच्या कण्यांचे विकार वाढत आहेत. या विकारांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने डॉक्टरांचे कौशल्य वर्धन केले जात आहे तसेच पाठीच्या कण्याच्या विकारांकरिता सामायिक व्यवस्थापन पद्धती विकसित केली जात आहे. देशात तसेच राज्यात महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे गरिबांनाही पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रिया करता येत आहेत, अशी माहिती ‘न्यूरो स्पायनल सर्जन्स असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. व्हर्नोन वेल्हो यांनी दिली.
पाठीच्या कण्याच्या तज्ज्ञांच्या ‘न्यूरो स्पायनल सर्जन्स असोसिएशन’ या संस्थेच्या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा आरंभ शुक्रवारी झाला. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी, जीवनशैलीतील बदलांमुळे पाठीच्या कण्यांचे विकार वाढत आहेत. मात्र, त्यासोबतच विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे वैद्यकीय क्षेत्रात नित्यनूतन संशोधन होत आहे. भारत पसंतीचे वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे. या पार्श्वभूमीवर पाठीच्या कण्याच्या आजारांच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये सहकार्य वाढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल यांनी केले.
या परिषदेला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पी. एस. रमणी, अध्यक्ष व्हर्नोन वेल्हो, आयोजक सचिव डॉ. सुमित पवार, न्यूरो सर्जन डॉ. प्रकाश मोढा, आदी उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते लीलावती रुग्णालयातील प्रसिद्ध न्यूरो सर्जन प्रा. डॉ. अतुल गोयल यांना डॉ. पी. एस. रमणी जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला, तर न्यूरो सर्जरी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. इको सुबागिओ व डॉ. ऑस्कर एल्विस यांना संस्थेचे मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते डॉ. पी. एस. रमणी यांनी लिहिलेल्या श्रीमद् भगवदगीतेवरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.