अकरावी प्रवेशामध्ये राज्य मंडळाचे विद्यार्थी राहणार मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 06:20 AM2018-10-21T06:20:42+5:302018-10-21T06:20:44+5:30
केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेतील नियमात बदल केला आहे.
मुंबई : केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेतील नियमात बदल केला आहे. त्यानुसार, आता प्रत्येक विषयात अंतर्गत आणि बाह्य मूल्यमापन परीक्षेत स्वतंत्रपणे उत्तीर्ण होण्याची अट मंडळाने मागे घेतली आहे. दुसरीकडे राज्य मंडळाने (एसएससी बोर्डाने) गुणवत्तेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मिळणारे अंतर्गत गुण रद्द केले आहेत. यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात अकरावी प्रवेशासाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागणार असल्याची चर्चा शिक्षणतज्ज्ञांमध्ये आहे.
राज्य मंडळाव्यतिरिक्त सीबीएसई बोर्ड, आयसीसी बोर्ड, आयबी बोर्ड या सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांना जवळपास १०० गुणांपैकी ४० पर्यंत अंतर्गत गुण दिले जातात, याउलट एसएससी बोर्ड आतापर्यंत विद्यार्थ्यांना वीस एवढे अंतर्गत गुण देत होते, परंतु या वर्षी गुणवत्ता वाढीचे कारण देत, ते गुण बंद करण्यात आले आहेत. याचा परिणाम २०१९-२० या शैक्षणिक वर्षात अकरावीच्या प्रवेशावेळी दिसून येईल.
मेट्रोपॉलिटिन शहरांमध्ये (मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक) सर्व टॉपच्या अनुदानित, विनानुदानित महविद्यालयांमध्ये एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना केवळ कमी गुणांमुळे गुणवत्ता असूनही प्रवेश मिळणार नाही. रुईया, रूपारेल, सेंट झेवियर्स, कीर्ती, एमडी, सोमय्या यासारख्या मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमधील प्रवेशाचे दार एसएससी बोर्डाच्या मुलांसाठी कायमचे बंद होतील, असे मत शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी व्यक्त केले आहे.
राज्यातील बहुतांश राज्य मंडळाचे विद्यार्थी हे अनुदानित शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र, निकोप स्पर्धा न होता गुणांच्या आधारावर इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेणे सोपे होईल. त्यामुळे पालकांचा ओढा इतर एसएससी बोर्डांऐवजी इतर बोर्डांच्या शाळांकडे आपोआप वाढेल, अशी खंतही सरोदे यांनी व्यक्त केली.
>या नियमाचा बसणार फटका
राज्य मंडळाव्यतिरिक्त सीबीएसई बोर्ड, आयसीसी बोर्ड, आयबी बोर्ड या सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांना जवळपास १०० गुणांपैकी ४० पर्यंत अंतर्गत गुण दिले जातात, याउलट एसएससी बोर्ड आतापर्यंत विद्यार्थ्यांना वीस एवढे अंतर्गत गुण देत होते, परंतु या वर्षी गुणवत्ता वाढीचे कारण देत, ते गुण बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशावेळी गुणांच्या स्पर्धेत एसएससी बोर्डाचे विद्यार्थी मागे राहण्याची भीती आहे.