‘समारंभात’ व्यस्त सुरेश प्रभूंची ‘अपघातग्रस्त’ चर्चगेटकडे पाठ
By admin | Published: June 30, 2015 02:50 AM2015-06-30T02:50:27+5:302015-06-30T02:50:27+5:30
रेल्वेच्या समारंभात व्यस्त असलेल्या रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी अपघातग्रस्त चर्चगेट स्थानकाला सोमवारीही भेट दिली नाही. त्यांनी चर्चगेट स्थानकाकडे पाठच फिरवल्याने रेल्वे अधिकाऱ्यांसह
मुंबई : रेल्वेच्या समारंभात व्यस्त असलेल्या रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी अपघातग्रस्त चर्चगेट स्थानकाला सोमवारीही भेट दिली नाही. त्यांनी चर्चगेट स्थानकाकडे पाठच फिरवल्याने रेल्वे अधिकाऱ्यांसह प्रवाशांकडूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चर्चगेट स्थानकात रविवारी सकाळी ११.२0 च्या सुमारास अपघात झाला. हा अपघात झाला त्यावेळी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि काही खासदारांसह आमदार या कार्यक्रमात व्यस्त होते. साधारण दीड तासांत कार्यक्रम आटोपल्यानंतर रेल्वे मंत्री प्रभू यांनी चर्चगेट स्थानकात अपघातग्रस्त ठिकाणी भेट न देणेचे पसंत केले.
महत्वाची बाब म्हणजे या अपघाताच्या भिषणतेची माहीती रेल्वे अधिकाऱ्यांकडूनच रेल्वे मंत्र्यांना देण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते.
रविवारीही भेट देण्यात न आल्याने निदान सोमवारी तरी प्रभू भेट देतील, अशी आशा वाटत असतानाच दादर स्थानकात दुपारी रेल्वेचा एक कार्यक्रम तासाभरात आटोपून त्यांनी काढता पाय घेतला.
प्रभूंनी चर्चगेट स्थानकात सोमवारीही भेट न दिल्याने रेल्वे अधिकाऱ्यांसह प्रवासी आणि पत्रकारांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेशच फक्त प्रभूंकडून रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आले. दोन दिवस मुंबईत असतानाही चर्चगेट स्थानकात अपघातग्रस्त ठिकाणी भेट न दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.