मूर्तिकारांवरील नोटीस मागे
By admin | Published: September 13, 2015 02:52 AM2015-09-13T02:52:17+5:302015-09-13T02:52:17+5:30
रात्री नऊ वाजण्यापूर्वी सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती कारखान्याबाहेर काढल्यास संबंधित मूर्तिकारांवर कारवाई करण्याचे मुंबई पोलिसांनी काढलेले परिपत्रक
मुंबई : रात्री नऊ वाजण्यापूर्वी सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती कारखान्याबाहेर काढल्यास संबंधित मूर्तिकारांवर कारवाई करण्याचे मुंबई पोलिसांनी काढलेले परिपत्रक मंडळांच्या आणि राजकारण्यांच्या दबावानंतर अवघ्या काही तासांतच मागे घेण्यात आला.
रात्री ९पर्यंतची वेळ ही रहदारीची आहे. या वेळेत सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती रस्त्यावर आल्यास वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. त्यामुळे मंडळांनी दिवसा गणेशमूर्ती कारखान्यातून बाहेर काढू देऊ नये. तसे केल्यास व त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्यास मूर्तिकार जबाबदार राहतील, अशी नोटीस भोईवाडा पोलीस ठाण्याने परळ रेल्वे वर्कशॉप मैदानातील मूर्तिकार विजय खातू, राजन खातू आणि राहुल घोणे यांच्यासह अन्य लहान-मोठ्या मूर्तिकारांना बजावली.
मूर्तिकार आणि गणेश
मंडळांनी आक्रमक पवित्रा घेत गणेशोत्सव महासंघ संघाचे
अध्यक्ष जयेंद्र साळगावकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर साळगावकर यांनी मुंबई भाजपाध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्यासह मूर्तिकारांच्या कारखान्याला भेट दिली. यानंतर शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्त जावेद अहमद यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून ही नोटीस मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार काही तासांतच पोलिसांनी ही नोटीस मागे घेतल्याचे जाहीर केले. याबाबत बोलताना शेलार यांनी सांगितले की, पोलिसांनी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आवश्यक तो ट्राफिक डिझास्टर प्लान तयार करावा. सर्वसामान्यांना त्रास होणार नाही असे वाहतुकीचे नियोजन करावे. मात्र अशा प्रकारे मूर्तिकारांवर बंधने लादून त्यांची कोंडी करू नये.