मागाठाणे मतदारसंघ : मनसेकडून नयन कदम यांना उमेदवारी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 03:58 AM2019-10-03T03:58:46+5:302019-10-03T03:59:11+5:30
दहिसरचा काही भाग आणि बोरीवली विधानसभा मतदारसंघाचा काही भाग मिळून मागाठाणे मतदारसंघ तयार झाला.
मुंबई : दहिसरचा काही भाग आणि बोरीवली विधानसभा मतदारसंघाचा काही भाग मिळून मागाठाणे मतदारसंघ तयार झाला. या विधानसभा क्षेत्रात मराठी मतदार हा महत्त्वाचा फॅक्टर म्हणता येईल. २००९ साली या मतदारसंघातून मनसे निवडून आली होती; तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने हा मतदारसंघ आपल्याकडे आणला. हा मतदारसंघ कोणत्याही एका पक्षाचा गड म्हणून ओळखला जात नाही. जो पक्ष मराठी मतदारांचे मन जिंकेल तोच या मतदारसंघावर आपली पकड मजबूत करणार असल्याने मनसेने पुन्हा एकदा मराठी कार्डची जादू वापरण्यासाठी नयन कदम यांना रिंगणात उतरवले आहे.
ईडीकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी झाल्यानंतर मनसे विधानसभा निवडणूक लढवणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. विधानसभा निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरून मनसेतच दोन गट पडले होते. मनसे निवडणूक लढवणार की नाही? असा प्रश्न कार्यकर्त्यांनाही पडला होता. शुक्रवारी मनसेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आणि त्या बैठकीत निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर मनसे विधानसभा निवडणुकीत १०० जागांवर निवडणूक लढवणार, अशी चर्चा सुरू आहे. मनसेने मंगळवारी संध्याकाळी २७ उमेदवारांची घोषणा केली आहे. मागाठाणे मतदारसंघामधून नयन कदम यांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
मनसे व युतीमध्ये लढत
मागाठाणे मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवार न दिल्याने सध्या तरी मनसेच्या नयन कदम यांची थेट लढत आता प्रकाश सुर्वे यांच्याशी असणार आहे. मनसेच्या नयन कदम यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बोरीवली मतदारसंघातून विद्यमान आमदार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याविरुद्ध लढत दिली होती. मागाठाणे मतदारसंघात मराठी टक्क्याचा प्रभाव असल्याने नयन कदम आपली ताकद या मतदारसंघातून आजमावणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.