खराब महामार्गाचा भुर्दंड गणेशभक्तांना
By Admin | Published: August 16, 2016 09:59 PM2016-08-16T21:59:08+5:302016-08-16T23:40:01+5:30
मुंबई-रत्नागिरी व्हाया सातारा : प्रत्येक प्रवाशाला द्यावे लागणार १०० ते १५० रुपये अधिक !
प्रकाश वराडकर -- रत्नागिरी --महाडमधील पूल दुर्घटना व मुंबई-गोवा महामार्गाची झालेली दुर्दशा, या पार्श्वभूमीवर येत्या गणेशोत्वात एस. टी.च्या २२११ फेऱ्या पनवेल मार्गा ऐवजी सातारा - चिपळूणमार्गे कोकणात जाणार आहेत. मात्र, या लांबच्या मार्गाने कोकणात पोहोचण्यास अधिक वेळ लागणार आहे. तसेच वाढीव तिकिटाचा अधिक भूर्दंड लाखो गणेशभक्तांना सोसावा लागणार आहे. याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल कोकणवासीयांतून केला जात आहे.
गेल्या काही दशकांपासून कोकण आणि मुंबईची नाळ नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जोडली गेली आहे. कोकण रेल्वे सुरू होऊन १८ वर्षांचा काळ लोटला आहे. त्याचबरोबर कोकणातून मुंबईत व मुंबईतून कोकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोकण रेल्वेचे आरक्षण गणेशोत्सवात फुल्ल असले तरी एस. टी. महामंडळाच्या गाड्यांनाही दरवर्षीप्रमाणेच आरक्षण आहे. एस. टी.चे महत्व आजही कमी झालेले नाही.
ज्या मुंबई-गोवा महामार्गावरून एस. टी.ची वाहतूक होते. त्या महामार्गाची जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. पेवर ब्लॉकद्वारे मार्गावरील खड्डे बुजविण्याचे प्रयत्न आता केले जात आहेत. परंतु, त्याचा फारसा उपयोग होईल, असे चित्र मात्र दिसून येत नाही. पेवर ब्लॉकही काही ठिकाणी निखळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या अ
ाठवडाभरानंतर या मार्गावरून दिवस-रात्र सुरू होणारी हजारो वाहनांची वर्दळ हा महामार्ग कसा पेलविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पंधरा दिवसांपूर्वीच महाड-पोलादपूर येथे मुंबई-गोवा महामार्गावरील पूल वाहून गेल्याने त्यावरून दोन एस. टी. बस व अन्य वाहने ही सावित्री नदीत बुडाली. यात मोठी जीवितहानी झाली. सरकारचे जुन्या पुलांवरील दुर्लक्ष या घटनेमुळे ऐरणीवर आले. आता गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी मुंबईकर गणेशभक्तांनी कोकणातील आपल्या गावात जाण्यासाठी दोन महिन्यांपूर्वीच एस. टी.चे आरक्षण करून ठेवले आहे. हे आरक्षण ठाणे, पनवेल, पेणमार्गे रत्नागिरी, सावंतवाडी या मार्गाचे आहे. मुंबई-महाडमार्गे रत्नागिरी अंतर ३३१ किलोमीटर आहे. तर हेच अंतर सातारामार्गे ४५२ म्हणजेच १२१ किलोमीटरने अधिक आहे. मुंबई-सावंतवाडी अंतर महाडमार्गे ५२१ किलोमीटर आहे. हेच अंतर सातारामार्गे प्रवास केल्यास ६४३ किलोमीटर होणार आहे. मुंबई-महाडमार्गे कणकवली अंतर ४५३ किलोमीटर आहे. सातारामार्गे हेच अंतर आणखी १२१ किलोमीटरने वाढणार आहे. बोरीवली मुंबईहून रत्नागिरी, कणकवली व सावंतवाडीला जाणाऱ्या एस. टी. प्रवासाचे सध्याचे अंतर दीडशे किलोमीटरने वाढणार आहे.
सध्या साध्या एस. टी.चे दिवसा प्रवासाचे मुंबई-रत्नागिरी तिकीट ३७८, रातराणी तिकीट ४४७ तर सेमी लक्झरीचे तिकीट ५१६ रुपये आहे. बोरिवली-रत्नागिरी एस. टी.चे दिवसा प्रवासाचे भाडे ३९७ प्रतिप्रवासी, रातराणीचे भाडे ४६९ तर सेमी लक्झरीचे भाडे ५१६ रुपये आहे. कणकवली व सावंतवाडीपर्यंतचे तिकीट याहून अधिक आहे. त्यामुळे महाडमार्गे रत्नागिरी, कणकवली व सावंतवाडी प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे आरक्षण असले तरी सातारामार्गे प्रवास करताना त्यांना प्रत्येकी १०० ते १५० रुपये फरकाची रक्कम भरावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गणेशोत्सव : एस.टी.च्या २२११ फेऱ्या...
रस्त्यांची दुर्दशा राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे झाली व त्याचा त्रास आणि आर्थिक भुर्दंड मात्र एस. टी.च्या प्रवाशांना सोसावा लागणार आहे. सातारामार्गे गाड्या आणण्याचा निर्णय घेणारे एस. टी. महामंडळ ही फरकाची रक्कम माफ करणार काय, असा सवालही केला जात आहे.