लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सोमवारी झालेल्या वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट केली असतानाच दुसरीकडे सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास वादळी पावसाचा अलर्ट मुंबईतल्या सर्व यंत्रणांना देण्यात आल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी सांगितले की, गेल्या आठवडाभरापासून मुंबईसह राज्यभरातील हवामानाचे अंदाज आवर्जून दिले आहेत. सोमवारी साडेतीन वाजताही मुंबईत होणाऱ्या वादळी पावसाचा अलर्ट रेल्वे प्रशासन, वाहतूक पोलिस, विमानतळ प्रशासनासह सर्व महत्त्वाच्या यंत्रणांना देण्यात आला होता. वादळी पावसात मुंबईच्या रेल्वे वाहतुकीने मान टाकली असतानाच रेल्वे वाहतुकीचाही पुरता बोजवारा उडाला होता.
लाल बहादूर शास्त्री मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गासह मुंबईतल्या बहुतांशी रस्त्यांवर ऐन गर्दीच्या वेळी कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीने नाकी नऊ आणले असतानाच रिक्षा, टॅक्सी मिळत नसल्याने प्रवाशांची दैना उडाली होती. वरळीपासून कुर्ला स्थानक गाठण्यासाठी दोन तास लागत होते. एव्हाना हा प्रवास तासाभरात होतो. हीच परिस्थिती मुंबईत सर्वसाधारणरित्या दिसत होती.
जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी नाका शाखेजवळील माडाचे झाड कोसळून दुर्घटना घडली. यात रिक्षाचे नुकसान झाले. झाडाखाली लहान मुले खेळत होती. सुदैवाने घटना घडण्यापूर्वीच ती तेथून निघाल्याने अनर्थ टळला. चर्चगेट परिसराला वाळवंटाचे स्वरूप प्राप्त झाले होते. ओव्हल मैदान, उच्च न्यायालय, सत्र न्यायालय, मुंबई विद्यापीठ परिसरही धुळीत होता.