आदित्य ठाकरेंनी लोकार्पण केलेल्या रस्त्याची ७ दिवसातच दुरावस्था; भाजपाचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 11:22 AM2022-06-27T11:22:04+5:302022-06-27T11:22:35+5:30
लोकार्पणानंतर अवघ्या काही दिवसांतच रस्त्यांवर खडी विखुरल्याचं दिसून आले.
मुंबई - काही दिवसांपूर्वीच बोरिवली पश्चिमेकडील आर. एम भट्ट मार्ग येथे महापालिकेच्या वतीने नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आलं होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते याचं लोकार्पण झाले. मात्र अवघ्या १० दिवसांत या उड्डाणपूलावरील रस्त्यांचे डांबर निघून खडी बाहेर आल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या पूलाच्या कामाबद्दल आता लोकांमध्ये शंका उपस्थित होत आहे.
भाजपा आमदार नितेश राणे यांनीही ट्वीट करत हया रस्त्याचं उद्घाटन मुंबईकरांसाठी केले होते की कंत्राटदारांच्या टक्केवारीसाठी? असा सवाल उपस्थित करत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत रस्त्याची दुरावस्था झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दर्जाबद्दल विरोधकांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधण्यात सुरुवात केली आहे. या उड्डाणपुलामुळे बोरिवलीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली. याठिकाणी रोज सकाळी आणि संध्याकाळी अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीत जातो. पावसाळ्यात तर कहर होतो मात्र उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न निकाली लागला. मात्र आता लोकार्पणानंतर अवघ्या काही दिवसांतच रस्त्यांवर खडी विखुरल्याचं दिसून आले. बोरिवली पश्चिममधील लिंक रोड ते फिल्डमार्शल करिअप्पा उड्डाणपुलाला जोडणारा हा उड्डाणपूल आहे.
हया रस्त्याचं उद्घाटन मुंबईकरांसाठी केले होते की कंत्राटदारांच्या टक्केवारीसाठी? @mybmc@CMOMaharashtra@BJP4Mumbaipic.twitter.com/62TqqGrx5V
— nitesh rane (@NiteshNRane) June 26, 2022
हा उड्डाणपूल प्रामुख्याने लिंक रोड आणि पश्चिमी द्रुतगती महामार्ग यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. येथील उड्डाणपुलामुळे श्मामाप्रसाद मुखर्जी चौक, कल्पना चावला चौक, साईबाबा नगर, राजेंद्र नगर आणि जवळपासच्या वाहतुकीला मदत होणार होती. स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन आणि कल्पना चावला चौक या दोन महत्त्वाच्या जंक्शनवरून हा पूल विस्तारीत झाला असल्याने वाहतुकीचा वेग वाढणारच आहेस सोबत प्रवासाच्या वेळेतही बचत होते. हा पूल बांधण्यासाठी जवळपास १७० कोटी रुपये खर्च झाल्याचं सांगितले जात आहे.
मुंबईकरांचा प्रवास होणार सुरळीत, सुखकर आणि वेगवान!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 18, 2022
आज बोरिवली पश्चिम येथील आर. एम. भट्टड मार्गावरील 'कोरा केंद्र' उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्याचा मान मला मिळाला. चार लेन असणाऱ्या ह्या पुलामुळे मुंबईकरांसाठी वाहतूक सुरळीत आणि गतिमान होणार आहे तसेच वेळेची व इंधनाचीही बचत होईल. pic.twitter.com/PUNFRmAkK6