मुंबई - इंडिगो कंपनीच्या विमानाने दिल्ली ते मुंबई या प्रवासा दरम्यान एका प्रवाशाला खाद्यपदार्थ दिल्याच्या घटनेची फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया अर्थात एफएसएसएआयने (भारतीय खाद्य संस्था व मानक प्राधीकरण) गंभीर दखल घेतली असून या संदर्भात कंपनीला कारणे दाखवा नोटिस जारी केली आहे.
२९ डिसेंबर रोजी दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या खुशबू गुप्ता या महिलेने प्रवासादरम्यान इंडिगो कंपनीच्या कॅटरिंग सेवेतून सँडविच मागवले होते. मात्र, त्या सँडविचमध्ये आळी आढळून आली होती. गुप्ता यांनी त्याचा सँडविचचा फोटो व व्हिडीओ काढत तो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. त्यानंतर इंडिगो कंपनीने दिलगिरी देखील व्यक्त केली होती.
मात्र, या प्रकरणाची एफएसएसएआयने गंभीर दखल घेत तुमच्या खाद्यान्नाचा परवाना रद्द का करू नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटिस जारी केली आहे. तसेच, या प्रकरणी कंपनीला सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.