स्वच्छतेच्या प्रगती पुस्तकावर सर्वत्र लाल शेरे; मुख्यमंत्री शिंदेंकडून मनपाची कानउघडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 09:35 AM2024-01-25T09:35:39+5:302024-01-25T09:38:48+5:30
सकाळी ७ ते ११ अधिकारी रस्त्यावर दिसलेच पाहिजेत; मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना झापले.
मुंबई : स्वच्छतेबाबत देश आणि राज्यपातळीवर मुंबईचा क्रमांक कमालीचा घसरल्याचे चित्र पाहून संतप्त झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाची चांगलीच कानउघडणी केल्यानंतर बुधवारी दिवसभर पालिकेत स्वच्छतेवर मॅरेथॉन बैठका झाल्या. प्रत्येक वार्ड अधिकारी सकाळी ७ ते ११ या कालावधीत आपापल्या प्रभागात रस्त्यावर दिसला पाहिजे याची खबरदारी घेतली जाणार असून मुंख्यमंत्र्यांनी सुरू केलेली डीप क्लिनिंगची मोहीम येत्या काही दिवसांत आणखी डीप लेव्हलला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
नोव्हेंबर महिन्यापासून व्यापक प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवूनही स्वच्छ भारत स्पर्धेत मुंबईचा देशात १८९, तर राज्यात ३७ वा क्रमांक आल्याने मुख्यमंत्री नाराज झाले अशी चर्चा होती. त्यातच त्यांनी मंगळवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी पाचारण केले होते. स्वच्छतेचा लेखाजोखा सोबत घेऊन गेलेल्या या अधिकाऱ्यांना बैठकीाधी सुमारे तीन तास ताटकळत रहावे लागले की मुद्दाम ठेवले गेले याची चर्चाही रंगली होती.
या बैठकीत शिंदे यांनी पालिका प्रशासनाचे चांगलेच कान टोचले होते. स्वच्छता मोहिमेचे आणखी चांगले रिझल्ट दिसले पाहिजेत, आपल्या मोहिमेचा इतर शहरांनी आदर्श घेतला पाहिजे, यादृष्टीने नेटाने प्रयत्न करा. तसेच कामाची फेरतपासणी करा, स्वच्छता केल्या जाणाऱ्या भागात पुन्हा अस्वच्छता होऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना करा, असा सज्जड दमच मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्याचे समजते. त्यामुळे हबकलेले पालिका प्रशासन चांगलेच ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहे.
पाच वेळा शौचालयांची स्वच्छता करा :
रोज साधारणपणे एक हजार किलोमीटरचे रस्ते धुवा, दिवसातून पाचवेळा सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करा, मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचीही सफाई करा, कचरा व्यवस्थापन प्रभावी करा, स्वच्छतादूतांची नियुक्ती करा, अशा सूचनांची सरबत्ती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केली होती.
मोहिमेतील अडचणींचे निराकरण करा :
त्यानुसार स्वच्छता मोहीम आणखी प्रभावी करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपायुक्त, सहआयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची दूरदृश्य बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोहीम व्यापक करणे तसेच मोहिमेतील अडचणींचे निराकरण करणे, याअनुषंगाने चर्चा झाली.
टँकरची संख्या वाढवण्याचा निर्णय :
पालिका सध्या ६०० किमीचे रस्ते धुवत आहे. एक हजार किमीचे लक्ष गाठण्यासाठी टँकरची संख्या वाढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. काही ठिकाणी प्रकल्पांची कामे सुरू आहेत, ते रस्ते आपल्या ताब्यात नाहीत, त्यामुळे तेथे स्वच्छता मोहीम राबवता येत नाही, अशी अडचण काही विभाग अधिकाऱ्यांनी मांडली.
काही अधिकाऱ्यांनी निधीची कमतरता भासत असल्याचे निदर्शनास आणून दिले. स्वच्छतादूतांची नियुक्ती केली आहे, त्यांची संख्या वाढण्यावर भर देण्यात आला.
एकूणच मोहीम व्यापक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्या सूचना केल्या आहेत, त्यावर अमलबजावणी करण्यासाठी विविध स्तरावर आढावा घेण्याचे या बैठकीत ठरल्याचे सांगण्यात आले.