Join us

खराब रस्ते, तुंबलेले ड्रेनेज, खड्ड्यांचा जाच नशिबी! मुंबईकरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2023 2:31 PM

नुसतीच इलेक्शनची हवा; नागरिकांमध्ये वाढतोय रोष

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तब्बल वर्षभरापासून मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवट असून, गेल्या नऊ महिन्यांपासून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. दुर्दैव म्हणजे वर्ष झाले मुंबईचे २२७  प्रभाग नगरसेवकांपासून वंचित असून, मुंबईचा गाडा प्रशासकीय यंत्रणा हाकत आहे. त्यामुळे वॉटर, गटर, मीटरसह मुंबईच्या नागरी प्रश्नांचा ऊहापोह करणारी यंत्रणाच कोलमडल्याने मुंबईकर खराब रस्ते, तुंबलेल्या ड्रेनेजसह खड्ड्यांच्या जाचाने त्रस्त आहेत.

उपनगरांतील सांताक्रूझ, कालिना, कुर्ल्यातील नागरिकांनी समस्यांचा पाढाच वाचला असून, आता मुंबईकर रस्त्यावर उतरू लागले आहेत. या नागरिकांमध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही असून, प्रशासनाविरोधातील रोष दिवसेंदिवस वाढतच आहे.

मागील काही महिन्यांपासून मनीपाडा कालिना, सांताक्रुझ येथील रहिवासी एमएमआरडीएच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त आहेत. कारण, मेट्रो ब्रिजच्या कामामुळे मनीपाडा परिसरातील ड्रेनेज लाइन निकामी झाल्या आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे. त्यामुळे वारंवार महापालिका, एमएमआरडीए यांना विनंती करूनही त्यांची दखल घेतली जात नव्हती. परिणामी प्रमिला, आम्रपाली, सम्राट, न्यू विनय, सुजाता अपार्टमेंट, मैत्री छाया सोसायटी यातील रहिवासी आंदोलनात सहभागी झाले होते.

अपूर्ण कामामुळे मनीपाडा रस्त्यावर साचते पाणी

स्टॉर्म-वॉटर ड्रेन्सची जोडणी नसल्याने पाणी तुंबते. स्टॉर्म-वॉटर ड्रेनअंतर्गत रस्त्यांवरून मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम अपूर्ण ठेवले आहे. यामुळे मनीपाडा परिसरात रस्त्यावर पाणी साचत आहे. रस्त्याच्या इलेव्हेशनमुळे येथे प्रवेश करणे पादचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे.

काय आहेत समस्या

  • सीएटी रोड, कलिना, सांताक्रूझ (पूर्व)च्या जवळ असलेल्या मलनिस्सारण वाहिन्या तुंबणे. 
  • सीएसटी रोडवर बीपीसीएल पेट्रोल पंपापासून ते सेंट्रल प्लाझापर्यंत सिवर लाइन टाकण्याचे, वळविण्याचे काम झालेले नाही.
  • एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुलाच्या कामादरम्यान दोन मॅनहोल्समध्ये सिमेंटचा गाळ आणि डेब्रिज टाकल्याने ती भरून वाहत आहेत.
  • रस्त्यावर पाणी ओसंडून वाहू नये, यासाठी पंप बसविण्याच्या सूचना एमएमआरडीएने दिल्या होत्या; पण कंत्राटदाराने पाऊल उचललेले नाही.
टॅग्स :मुंबई