बेक्कार उन्हाळा! मुंबईकरांचा घाम निघाला; शहर पुन्हा तापले
By सचिन लुंगसे | Published: May 16, 2024 07:21 PM2024-05-16T19:21:35+5:302024-05-16T19:22:13+5:30
यंदाच्या उन्हाळ्यात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक नोंदविण्यात येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता.
मुंबई : मान्सूनपुर्व पावसाने दिलेल्या तडाख्यानंतर मुंबई दिवसेंदिवस तापत असून, गुरुवारच्या उष्ण आणि दमट हवामानाने तर मुंबईकरांचा अक्षरश: जीव नकोसा केला. सकाळपासूनच तापदायक वातावरणात नोंदविण्यात आलेल्या ७० टक्के आर्द्रतेमुळे मुंबईकरांचा घाम निघाला. सकाळपासून सायंकाळपर्यंत उष्ण आणि दमट हवामानामुळे मुंबईकरांची सतत घामाच्या धारेने आंघोळ होत असल्याचे चित्र होते.
यंदाच्या उन्हाळ्यात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक नोंदविण्यात येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. शिवाय उष्णतेच्या लाटांचे दिवसही तुलनेने अधिक नोंदविले जातील, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार, एप्रिल महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेने मुंबईकरांना हैराण केले होते. मे महिन्यात उष्णतेच्या लाटांसोबत उष्ण, दमट हवामानाचे प्रमाण कमी होईल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र आता मान्सून तोंडावर आला तरी उष्णतेच्या लाटा, उष्ण व दमट हवामान कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे.
गुरुवारी आर्द्रता खूप जास्त होती. हे प्रमाण ५५ - ६० टक्के होते. मुंबईत उष्णतेची लाट नसली तरी उच्च आर्द्रता आणि ३५-३६ अंश सेल्सिअस यांच्या संयोगामुळे गुरुवारी तापमान जास्त असलयाचे जाणवत होते. - अथेया शेट्टी, हवामान अभ्यासक
मुंबई महानगर प्रदेशात उष्णतेची लाट होती. मुंबईत उष्ण व दमट हवामान होते. वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकरांना उन्हाळ्याचा अधिक त्रास होतो आहे. वा-याच्या दिशा बदलामुळे हवामानात बदल नोंदविण्यात येत असून, हवामान खात्याकडून बदलाचे अंदाज वर्तविले जात आहे. - सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग
१८ मे पर्यंत मुंबईसह कोकणातील कमाल व किमान तापमाने ३७ व २७ दरम्यान जाणवतील. हे कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ तर किमान तापमान एक ते दिडने अधिक आहे. त्यामुळे तेथे उष्णतेची लाट तर नव्हे पण उष्णतेच्या लाटसदृश्य स्थिती व दमटयुक्त उष्णतेचे वातावरण जाणवेल. तसेच रात्रीच्या उकड्यातही वाढ होईल. उष्णतेचा प्रभाव मुंबई शहर, ठाणे येथे अधिक जाणवेल. - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
अंदाज काय ?
उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण व दमट परिस्थिती राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडयात पाऊस पडेल. मुंबईत उष्ण, दमट परिस्थिती राहील. सायंकाळी मेघगर्जनेसह वारे वाहतील.
कुठे किती पारा
अहमदनगर ३७.२
छत्रपती संभाजी नगर ३९.९
बीड ३८.२
जळगाव ४२.८
कोल्हापूर ३६.८
मालेगाव ३९.२
मुंबई ३५.९
नांदेड ३८.६
नाशिक ३८.१
धाराशीव ३७
परभणी ३८.१
सांगली ३७.५
सातारा ३७.७
सोलापूर ३८.६