मुंबई : मलबार हिल जलाशय पुनर्बांधणी संदर्भात पाहणीसाठी शहर विभागात काही परिसरात पाणीकपात तर काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामध्ये ए, सी, डी, जी-उत्तर, जी-दक्षिण या विभागांचा समावेश होता. जलाशयातील कप्पा पूर्ण रिक्त करून पुन्हा भरण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना २४ तास गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून ए, सी, डी, जी-उत्तर, जी-दक्षिण विभागातील नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
मलबार जलाशयाची पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टीने मुंबई आय.आय.टी.चे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ समितीने मलबार हिल जलाशयातील कप्पा क्रमांक २ अ आणि २ ब ची गुरुवारी अंतर्गत पाहणी केली.
या पाहणीसाठी जलाशयाचा कप्पा क्रमांक २ रिक्त करण्यात आला होता. त्यामुळे दिवसभरात शहर भागात पाणीटंचाई होती. पुनर्बांधणीच्या प्रस्तावाचे पुनरावलोकन करुन या समितीने योग्य कार्यपद्धती सुचविणे अपेक्षित आहे.