महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 05:35 AM2024-05-14T05:35:04+5:302024-05-14T05:36:24+5:30
मुंबई आणि परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. अर्धा तास कोसळलेल्या जलधारांमुळे सर्वत्र दाणादाण उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/ठाणे/ डोंबिवली/ कल्याण: वैशाखातील प्रचंड उष्म्यामुळे वातावरण तप्त असतानाच सोमवारी अचानक मुंबई आणि परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. अर्धा तास कोसळलेल्या जलधारांमुळे सर्वत्र दाणादाण उडाली. रेल्वे, रस्ता आणि विमान वाहतुकीला या पावसाचा मोठा फटका बसला. त्यामुळे मुंबईकर आणि नोकरदारांची त्रेधातिरपीट उडाली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावरही त्यामुळे शब्दश: पाणी फेरले गेले.
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, रायगड आणि पालघर परिसरात सोमवारी दुपारनंतर आकाशात अचानक काळ्या ढगांची गर्दी जमली. सोसाट्याचा वारा सुटला. धुळीचे लोट निर्माण झाले आणि पाठोपाठ वरुणराजाही अवतरला. त्यामुळे दमट वातावरणात मुंबई आणि महामुंबईकरांना दिलासा मिळाला. नवी मुंबई, ठाण्यातून हवामान बदलाला सुरुवात झाली. दाटून आलेल्या ढगांनी दक्षिण मुंबईकडे आगेकूच करण्यास सुरुवात केली.
वादळी वारे मुंबईवर घोंगावत असतानाच धूळ वातावरणात मिसळल्याने मुंबईच्या आसमंतात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. मुलुंड, भांडूप, कांजुरमार्ग, नाहुर, कुर्ला, घाटकोपर, पवई, सायन, दादर असा रोख करत वादळी वारे दक्षिण मुंबईत दाखल झाले. तोवर मुंबईच्या उपनगरात पावसाने विशेषत: वादळी वाऱ्याने थैमान घातले होते. दादरच्या शिवाजी पार्कची धूळ वातावरणात मिसळत असतानाच लालबाग, परळ, वरळीपासून महालक्ष्मी, भायखळा आणि फोर्टपर्यंत सर्वत्र वादळी पावसाने थैमान घातले. वादळी वाऱ्याची तीव्रता वाढत असल्याने गगनचुंबी इमारतीही दिसेनाशा झाल्या होत्या.
अचानक सुटलेल्या वादळीवाऱ्यामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी तांराबळ उडाली़ या वाऱ्यामुळे चिंतामणी चौक येथे बिल्डिंगची छतावरील पत्र्याची शेड उडून रस्तावर पडली. सुदैवाने हे पत्रे काेणावर पडले नाही़.