वाडा पोलिसांना हवा असलेला भामटा गजाआड
By admin | Published: December 5, 2014 11:09 PM2014-12-05T23:09:20+5:302014-12-05T23:09:20+5:30
वाडा तालुक्यातील प्रमुख गावातून महिलांना बोलण्यातून भूल घालून घरातील सोने लुटणारा भामटा गेले काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
कुडूस : वाडा तालुक्यातील प्रमुख गावातून महिलांना बोलण्यातून भूल घालून घरातील सोने लुटणारा भामटा गेले काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र वाड्यातील एका इसमाला संशय आल्याने त्याची खबर देताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गजाआड केले.
राजेश मोरे असे या भामट्याचे नाव असून तो बोईसर येथील रहिवासी आहे. बायकांना गप्पांची भुरळ घालून तो घरातील सोने लंपास करायचा . वाड्यातील खानिवली गावातील सीताबाई कुंभार यांच्या घरात कुणीही नाही याची खात्री झाल्यानंतर चार तोळ्याची गंठण लांबविली. त्यानंतर वाझ आणि गांध्रे येथेही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याची त्याने कबुली दिली. वाडा शहरात स्वस्तात तांदूळ विकतो असा बहाणा करून पैसे गोळा करण्याच्या कामासाठी आला असता त्याच्यावर संशय आला. यावरुन एका इसमाने पोलिसांना खबर देताच पोलिसानी राजेशला ताब्यात घेतले. दम देताच त्याने वाडा, विरार,वालीव, सफाळे, गणेशपुरी, भिवंडीत अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली. याविषयी अधिक तपास वाडा पोलीस अधिकारी संजय हजारे करीत आहेत. (वार्ताहर)