मुंबईत ५९ जणांवर कारवाई, नियंमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४३ गुन्हे
दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांंवर बडगा
मुंबईत ५९ जणांवर कारवाई : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : थर्टी फर्स्टनिमित्ताने दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांंनी यंदा कोरोनाचे संकट त्यात पोलिसांच्या कारवाईचा धसका घेतलेला पाहायला मिळाला. मुंबईत ड्रंक ॲण्ड ड्रॉइव्हचे ५९ गुन्हे नोंद झाले आहेत. गेल्या वर्षी हाच आकडा ६७७ एवढा होता.
मुंबईत ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी मुंबई पोलिसांबरोबर वाहतूक विभागाकडून ९४ टीम बनविण्यात आल्या. यात ३ हजार वाहतूक पोलिसांचा फाैजफाटा तैनात होता. गेल्या वर्षी ड्रंक ॲण्ड ड्राइव्हचे ६७७ गुन्हे नोंदविण्यात आले होते. वाहतूक विभागाने महाराष्ट्र परिवहन विभागाला या सर्वांचे लायसन्स सहा महिन्यांसाठी रद्द करण्यासाठी पत्र लिहून शिफारस केली होती. यंदाही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात पोलीस यंत्रणा तैनात होती.
यात ठिकठिकाणी नाकाबंदी करीत पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. चालक दारूच्या नशेत आढळल्यास वाहनात असलेल्या अन्य सहकाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात येणार होता. त्यामुळे मुंबईकरांनीही या कारवाईचा धसका घेतलेला पाहावयास मिळाला. तर काहींनी स्वतःहून दारूच्या नशेत वाहन चालविणे टाळून पोलिसांना सहकार्य केले. यात ५९ जणांविरुद्ध ड्रंक ॲण्ड ड्रॉइव्हप्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले. तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८८ कलमाअंतर्गत ४३ गुन्हे नोंद झाले असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिली.
............................